कव्वाली कार्यक्रमात मोहम्मद सिराजवर पैशांचा पाऊस, Video व्हायरल
Siraj Viral Video : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दक्षिण आफ्रिकेविरुद्दच्या टी20 आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. यानंतर आपल्या घरी म्हणजे हैदराबादला पोहोचल्यानंतर त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mohammed Siraj Qawwali Nights Video : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) दक्षिण आफ्रिकेत टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर सिराजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात सिराजवर नोटांचा पाऊस पडताना दिसतोय. हा व्हिडिओ हैदराबादमधला असल्याचं सांगितलं जातंय.
सिराजवर पैशांचा पाऊस
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 आणि कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली. दोन कसोटी सामन्यात सिराजने तब्बल नऊ विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये सिराजने तब्बल सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा सघ अवघ्या 55 धावांवर बाद झाला. या कामगिरीनंतर घरी म्हणजे हैदराबादला पोहोचलेल्या सिराजचं जोरदार स्वागत करण्यात आलं. हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कव्वाली नाईट्समध्ये सिराज सहभागी झाला होता. सिराज कव्वाल पार्टीबरोबर व्यासपिठावर बसलेला या व्हिडिओत दिसत आहे. यावेळी त्याच्यावर पैशांचा पाऊस पडतानाही दिसतोय.
या व्हिडिओत सिराज कव्वालीचा आनंद घेताना दिसतोय. यावेळी काही व्यक्तीने त्याच्यावर नोटांचा पाऊस पाडला. सिराजचे मित्रही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गायकाने सिराजला आपल्या बाजूला बसण्याचंही आमंत्रण दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणार
मोहम्मद सिराजने अगदी वेळेत भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. भारतासाठी सिराज आतापर्यंत 23 कसोटी, 41 एकदिवसीय आणि 10 टी20 सामने खेळला आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिराजने प्रत्येकी 68 विकेट घेतल्या आहेत. तर टी20त त्याच्या नावावर 12 विकेट जमा आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारत आणि इग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजचा भारतीय संघात समावेश निश्चित मानला जातोय.
पदार्पणाच्या तीन वर्षांनी खेळला दुसरा एकदिवसीय सामना
मोहम्मद सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नव्हती. विशेष म्हणजे या सामन्यानंतर पुढील तीन वर्षं त्याला संधी मिळाली नव्हती. सहा वर्षांनी 2022 मध्ये त्याने आपल्या करिअरमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला होता. एकदिवसीय आयसीसी क्रमवारीत सिराजने पहिलं स्थानही पटकावंल होतं.