लंडन : भारत आणि इंग्लंडमधली शेवटची वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. ३ मॅचच्या या सीरिजची पहिली वनडे भारतानं तर दुसरी वनडे इंग्लंडनं जिंकल्यामुळे सीरिज सध्या १-१नं बरोबरीमध्ये आहे. २०१९ साली होणारा वर्ल्ड कप हा इंग्लंडमध्येच होणार असल्यामुळे ही सीरिज म्हणजे वर्ल्ड कपआधी भारतीय टीमची ही शेवटची परीक्षाच आहे. टीममध्ये चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी भारतीय टीमला अजूनही योग्य खेळाडू सापडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ सालच्या वर्ल्ड कपनंतर भारतानं अनेक खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी दिली पण कोणत्याच खेळाडूला छाप पाडता आली नाही. याआधी भारतानं चौथ्या क्रमांकावर ८ पेक्षा जास्त खेळाडूंना संधी दिली. युवराज सिंग, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, केदार जाधव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या आणि आता के.एल. राहुल यांनी मधल्या काळात चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली. पण यापैकी कोणालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये राहुलला बॅटिंगची संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या वनडेमध्ये तो शून्यवर आऊट झाला.


चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येणारा बॅट्समन हा टीममधला वरची फळी आणि खालच्या फळीतला महत्त्वाचा दुवा मानला जातो. वरच्या फळीतले बॅट्समन लवकर आऊट झाले तर चौथ्या क्रमांकावरचा बॅट्समन इनिंग धरून ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. पण युवराजनंतर भारतीय टीमला चौथ्या क्रमांकावरचा भरवशाचा बॅट्समन अजूनही सापडलेला नाही.


सौरव गांगुलीचा सल्ला


विराट कोहलीनं चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवावं, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं दिली आहे.


गौतम गंभीरचं मत


तर अश्विन किंवा कृणाल पांड्याचा चौथ्या क्रमांकासाठी विचार करावा, असं मत गंभीरनं व्यक्त केलं. अश्विनला भारतीय टीममध्ये संधी दिली तर भारताची सहाव्या बॉलरची चिंताही मिटेल, असं गंभीर म्हणाला. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करत होता. त्यामुळे विराटनं चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली तरी चालेल, अशी प्रतिक्रिया गंभीरनं दिली.


भारतीय टीम जवळपास निश्चित


वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम ही जवळपास निश्चित झाली आहे. ओपनिंगला शिखर धवन आणि रोहित शर्मा, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, पाचव्या क्रमांकावर रैना किंवा कार्तिक, सहाव्या क्रमांकावर धोनी आणि सातव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या खेळेल. पण चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवायचं यामुळे मात्र विराट आणि रवी शास्त्रीची डोकेदुखी वाढली आहे. या सात बॅट्समननंतर कुलदीप यादव-युझवेंद्र चहल हे दोन स्पिनर आणि भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे खेळाडू वर्ल्ड कपसाठी पहिली पसंती असतील.