मुंबई :  फिलिपिन्स इथे पार पडलेल्या एकोणीसव्या आशियाई ज्युनिअर रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत (19th Asian Junior Rhythmic Gymnastics Competition) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी गेली. परिणा राहुल मदनपोत्रा (Parina Madanpotra) हिने भारताकडून (India) आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.  मनिलामध्ये झालेल्या 19व्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत परिणाने मदनपौत्रा हिने जपान, कोरिया यांसारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांवर सरशी साधत सातासमुद्रापार भारताचा डंका वाजवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 मे ते 3 जून या कालावधीत रंगलेल्या या स्पर्धेत परिणा मदनपोत्रा हिने ज्युनियर गटात (Junior Group) अप्रतिम कामगिरी करत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. मलेशिया, कोरिया, जपान यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असतानाही परिणाने 24.15 गुणांची कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी परिणा ही भारताची पहिली जिम्नॅस्ट (Gymnast) ठरली आहे. एशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मुख्य प्रशिक्षक वर्षा उपाध्ये (Varsha Upadhye), प्रशिक्षक क्षिप्रा जोशी (Kshipra Joshi) आणि सदिच्छा कुलकर्णी (Sadichchha Kulkarni) यांनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. 


लिलावती पोदार हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या परिणाने 2014 पासून रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाला सुरुवात केली. शिक्षण आणि खेळ यांची योग्य सांगड घालत परिणाने राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही अफलातून कामगिरी करत अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत. गेल्या वर्षी थायलंड इथं झालेल्या अठराव्या आशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणाने चांगली कामगिरी केली होती, मात्र अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिलं होतं. त्याआधी 2018 मध्ये हाँगकाँग इथं झालेल्या हाँगकाँग इंटरनॅशनल रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत परिणा मदनपोत्रा हिने दोन सुवर्णपदकांवर नाव कोरत भारताचं नाव उज्ज्वल केलं. आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतने परिनाने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 37 सुवर्णपदकं, 19  रौप्य पदकं आणि 14 कांस्य पदकांची कमाई केली आहे.


अनेक राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही परिणाने आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी ठाणे इथं झालेल्या सीआयसीएसई-राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत परिणाने पाच सुवर्ण पदकांची लयलूट करत दोन रौप्यपदकांवरही मोहोर उमटवली होती. त्याआधी 2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन कांस्यपदके आपल्या नावावर केलीत. 2019 च्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत परिणा हिने पाच सुवर्णपदके प्राप्त केली होती. त्यासोबत विविध कार्यक्रमांमध्येही तिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्स या खेळाचे सादरीकरण केलं आहे.