मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. ३९९ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम २६१ रनवर ऑल आऊट झाली. या विजयानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाचे कॉमेंटेटर कॅरी ओकीफी आणि मार्क वॉवर निशाणा साधला. जसप्रीत बुमराहसारखा बॉलर भारतातल्या शानदार स्थानिक क्रिकेटमुळे धोकादायक बनला आहे, असं विराट म्हणाला. कॅरी ओकीफी आणि मार्क वॉ यांनी कॉमेंट्री करताना भारतातल्या रणजी ट्रॉफी क्रिकेटवर आक्षेपार्ह टीका केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या प्रथम श्रेणी क्रिकेटची रचना सर्वोत्तम आहे, त्यामुळे आम्हाला विजय मिळत आहेत. भारतातलं प्रथम श्रेणी क्रिकेट आमच्या फास्ट बॉलरना आव्हान देतं, त्यामुळे परदेशातल्या मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांवर ते चांगली कामगिरी करतात, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली.


बुमराहचंही रणजी ट्रॉफीला श्रेय


या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहनं पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ अशा एकूण ९ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आम्ही कठोर ट्रेनिंग करतो आणि रणजी ट्रॉफीमध्येही खूप ओव्हर बॉलिंग करतो. एवढी बॉलिंग करण्याची आमच्या शरिराला सवय आहे आणि शरिरही एवढी बॉलिंग करायला तयार असतं, असं वक्तव्य जसप्रीत बुमराहनं केलं आहे.


काय म्हणाला ओकीफी आणि वॉ?


रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालनं केलेलं त्रिशतक रेल्वे कॅन्टीनच्या कामगारांविरुद्ध केलं होतं. त्या टीममध्ये शेफ आणि वेटरही होते, असं ओकीफी कॉमेंट्री करताना म्हणाला. यावेळी ओकीफी याच्याबरोबर शेन वॉर्न आणि मार्क वॉदेखील होते. मार्क वॉनं देखील मयंक अग्रवालवर निशाणा साधला. मयंक अग्रवालची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली ५० (४९.९८)ची सरासरी ही ऑस्ट्रेलियात ४० सारखी आहे, असं मार्क वॉ म्हणाला. मयंक अग्रवालनं २०१७ साली महाराष्ट्राविरुद्धच्या मॅचमध्ये ३०४ रनची खेळी केली होती. मयंकनं २०१७-१८ च्या रणजी मोसमात ८ मॅचमध्ये १०५.४५ च्या सरासरीनं १,१६० रन केले होते. यामध्ये ५ शतकं आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. ओकीफीनं ऑस्ट्रेलियाकडून २४ टेस्ट मॅचमध्ये ५३ विकेट घेतल्या आहेत.


ओकीफीचा माफीनामा


कॉमेंट्रीदरम्यान केलेल्या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर केरी ओकीफी यानं माफी मागितली. अग्रवालनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेल्या रनचा दाखला देताना माझी जीभ घसरली. मयंक अग्रवालची कामगिरी कमी दाखवण्याचा माझा उद्देश नव्हता. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ओकीफी म्हणाला. मार्क वॉ यानंही ट्विटरवरून मयंक अग्रवालच्या कामगिरीचं कौतुक केलं.


ओकीफीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य


माफी मागितल्यानंतर ओकीफीनं चौथ्या दिवशी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. कॉमेंट्री करताना त्याला चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाचं नाव नीट उच्चारता आलं नाही. तुम्ही मुलाचं नाव चेतेश्वर, जडेजा का ठेवता? असं ओकीफी म्हणाला.