INDvsAUS: `मेलबर्नची खेळपट्टी दोन्ही टीमना हैराण करेल`
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण पाच दिवस आधीच मेलबर्नच्या खेळपट्टीची चर्चा सुरु झाली आहे. मेलबर्नमध्ये असलेली विकेट दोन्ही टीमना हैराण करणारी असेल, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं केलं आहे. या खेळपट्टीविषयी आत्तापासूनच अंदाज बांधणं कठीण असल्याचं स्टार्क म्हणाला. मेलबर्नमध्ये याआधी २०१७ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झालेली टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. त्या मॅचमध्ये एलिस्टर कूकनं २४४ रनची खेळी केली होती. तर स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरनं शतक केलं होतं. या मॅचमध्ये वापरण्यात आलेली खेळपट्टी धीमी होती. आयसीसीनंही ही खेळपट्टी खराब असल्याचा शेरा दिला होता.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्टनंतर या मैदानात स्थानिक शेफिल्ड शील्ड स्पर्धेतल्या पहिल्या राऊंडच्या काही मॅच खेळवण्यात आल्या. पिच क्युरेटरनं या खेळपट्टीमध्ये काही बदलही केले आहेत.
या खेळपट्टीकडून काय अपेक्षा करायच्या ते मला माहिती नाही. मागच्या वर्षी झालेल्या मॅचमध्ये मी खेळलो नव्हतो. बाहेर बसून मी मॅच बघितली होती, असं स्टार्क ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. यावेळी ही खेळपट्टी मागच्यावेळपेक्षा जास्त जलद असण्याची अपेक्षा आपण करू शकतो, अशी प्रतिक्रिया स्टार्कनं दिली. या खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यासाठी पिच क्युरेटर आग्रही असल्याचं बोललं जातंय.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधली ४ टेस्ट मॅचची सीरिज १-१नं बरोबरीत आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये खेळवण्यात येणारी बॉक्सिंग डे टेस्ट आणखी महत्त्वाची मानली जात आहे. या टेस्टमध्ये ज्या टीमचा विजय होईल त्या टीमचा सीरिजमध्ये पराभव होणार नाही.