INDvsAUS:अशी असणार ऍडलेडची खेळपट्टी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे.
ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या जलद आणि उसळणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय बॅटिंगपुढे मोठं आव्हान असणार आहे. पण भारतीय बॉलरनाही याचा फायदा करून घेऊन उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी आहे. भारतीय फास्ट बॉलिंग सध्या सर्वोत्तम असल्याचं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव त्यांच्यावरच उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच ऍडलेडच्या मैदानाचे पिच क्युरेटर डॅमियन हॉग यांनी खेळपट्टीविषयी माहिती दिली.
ऍडलेडच्या खेळपट्टीवर आम्ही थोडसं गवत ठेवलं आहे, असं हॉग यांनी सांगितलं. मागच्या तीन सत्रांमध्ये इकडे डे-नाईट टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातली पहिली टेस्ट ३ दिवस, दुसरी टेस्ट ४ दिवस आणि तिसरी टेस्ट ५ दिवस चालली. डे-नाईट टेस्टमध्ये गुलाबी बॉल वापरला जातो. या बॉलची चमक जास्तवेळ राहावी म्हणून आम्ही खेळपट्टीवर जास्त गवत ठेवायचो. भारताविरुद्धची टेस्ट लाल बॉलनी खेळवण्यात येणार आहे. पण त्यासाठी खेळपट्टीमध्ये बदल करायची गरज नसल्याचं हॉग यांना वाटतंय.
लाल बॉल आणि गुलाबी बॉलच्या क्रिकेटसाठी आम्ही एकाच प्रकारची खेळपट्टी बनवतो. यावेळी आम्ही काहीही वेगळं केलेलं नाही. फक्त मॅच डे-नाईट नसल्यामुळे लवकर सुरु होईल. त्यामुळे खेळपट्टीवरचं कव्हरही लवकर काढलं जाईल. खेळपट्टीवर गवत ठेवल्यामुळे बॅट्समन आणि बॉलरमध्ये समान मुकाबला व्हायला मदत होईल, असं वक्तव्य हॉग यांनी केलं.
'ऍडलेडमधून सुरुवात भारताच्या फायद्याची'
ऍडलेडमधून टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. हे भारतीय टीमच्या फायद्याचं आहे, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे माजी फास्ट बॉलर जेफ लॉसन यांनी केलंय. ब्रिस्बेन किंवा पर्थमधून भारताला पहिल्या टेस्ट मॅचची सुरुवात करायची नव्हती, असं लॉसन म्हणाले. भारताकडे चांगले फास्ट बॉलर आणि स्पिनर आहेत. हे बॉलर ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना त्रास देऊ शकतात, अशी प्रतिक्रिया लॉसन यांनी दिली. ईशांत शर्माचा हा कदाचित शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. ईशांत शर्मा बॉलला उसळी देऊ शकतो तर उमेश यादवही चांगली बॉलिंग करतो. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार स्विंग करतात, असं लॉसन म्हणाले.