पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पर्थमध्ये होणाऱ्या या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियानं हिरवीगार खेळपट्टी तयार केली आहे. पण भारताची फास्ट बॉलिंग पाहिली तर ऑस्ट्रेलियाचा हा डाव त्यांच्यावरही उलटू शकतो. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीनंही या हिरव्या खेळपट्टीचं स्वागत केलं आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आता या खेळपट्टीवरचं गवत काढणार नाही, अशी अपेक्षा करतो, असा इशारा विराटनं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळे आपण खुश असल्याचं विराटनं एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं. गवत असल्यामुळे ही खेळपट्टी भारताच्या फास्ट बॉलरना आणखी मदत करेल. आम्ही या टेस्टमध्ये आणखी सकारात्मक मानसिकता घेऊन मैदानात उतरू असं विराट म्हणाला.


मोठा स्कोअर बनवण्याचा फायदा नाही


टेस्टमध्ये मोठा स्कोअर करण्यात काहीही अर्थ नसतो. जोपर्यंत तुमचे बॉलर दोन्ही इनिंगमध्ये २०-२० विकेट घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. तुमचे बॉलर चांगलं प्रदर्शन करत नसतील तर तुम्ही ५००-६००चा स्कोअर केला तरी त्याचा फायदा नाही. तुमचे बॉलर २० विकेट घेऊ शकत असतील तर ३०० रनचा स्कोअरही खूप आहे, असं विराटला वाटतं.


दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीम


विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव


नवीन मैदानातली खेळपट्टीही जलद


पर्थमध्ये होणारा हा सामना नव्या ऑप्टिस स्टेडियमवर होणार आहे. आत्तापर्यंत या स्टेडियमवर दोन आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या असल्या तरी, ही पहिलीच टेस्ट असेल. एकही टेस्ट न झाल्यामुळे ही खेळपट्टी कशी असेल याबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या पिचवर टॉस हा जुगार ठरू शकतो, अशात टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची का बॉलिंग, तसंच कोणत्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश करायचा हा निर्णय घेणं कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पिच क्युरेटरनी सांगितल्याप्रमाणे ही खेळपट्टी पर्थचं याआधीचं मैदाना असलेल्या वाका प्रमाणेच जलद असेल. वाकाची खेळपट्टी ही जगातली सगळ्यात जलद खेळपट्टी मानली जाते.