मेलबर्न : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरु असलेले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. पहिली टेस्ट जिंकल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १४६ रननी पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पहिल्या टेस्ट मॅचवेळी आर.अश्विनला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या टेस्टला तो मुकला. अश्विनऐवजी पहिल्या १३ खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाची टीममध्ये निवड करण्यात आली. पण आता रवींद्र जडेजाही पूर्ण फिट नसल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असतानाच रवींद्र जडेजाच्या खांद्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर चार दिवसांनी जडेजाला इंजक्शन दिलं गेल्याचा खुलासा शास्त्रींनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थ टेस्टमध्ये भारत ४ फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर नॅथन लायननं पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट अशा एकूण ८ विकेट घेतल्या होत्या.   


मग जडेजा फिल्डिंग का करत होता?


पर्थ टेस्टसाठी जडेजा पूर्णपणे फिट नसल्याचा दावा शास्त्री करत असले तरी पर्थ टेस्टमध्ये रवींद्र जडेजा बहुतेक वेळ फिल्डिंग का करत होता? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


फिट नसताना ऑस्ट्रेलियाला का नेलं?


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला फिटनेसची समस्या आधीपासूनच भेडसावत आहे. पहिल्या टेस्ट मॅचनंतर रोहित शर्मा आणि अश्विनला दुखापत झाली होती. मग जडेजा भारतात असतानाच त्याला दुखापत होती, मग त्याला ऑस्ट्रेलियाला का पाठवण्यात आलं? हा सवाल आहे.


रवी शास्त्रींची सारवासारव


जडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागल्याच रवी शास्त्री म्हणाले. एखादा बॉलर ५-१० ओव्हर टाकून पुन्हा बाहेर जायचा गोंधळ नको म्हणून आम्ही जडेजाला टीममध्ये घेतलं नसल्याचं शास्त्री म्हणाले. पर्थ टेस्ट सुरु व्हायच्या आधी जडेजा ७० ते ८० टक्केच फिट होता, त्यामुळे आम्ही जडेजाला खेळवण्याचा धोका पत्करला नसल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं.


रोहित शर्मा पाठीच्या दुखापतीमधून सावरत आहे आणि त्यानं सराव सुरु केला आहे. तर पुढच्या ४८ तासांमध्ये अश्विनवर लक्ष ठेवलं जाईल. फिटनेस ही मोठी चिंता आहे, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.


पांड्या फिट पण...


हार्दिक पांड्या हा फिट असला तरी त्याला मॅचचा सराव नसल्याची सावध प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. पांड्या आल्यामुळे आम्हाला पाचव्या बॉलरचा पर्याय मिळाला आहे, पण त्यानं फक्त एक प्रथम श्रेणी मॅच खेळली आहे. एका मॅचवर निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला सतर्क राहावं लागेल, असं शास्त्री म्हणाले.