INDvsAUS: लाखो मैल लांब बसून टीका करणं सोपं, रवी शास्त्रींचा निशाणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. पर्थमध्ये झालेल्या या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं १४६ रननी दणदणीत विजय मिळवला. यानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर टीकेची झोड उठली. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायननं या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३ विकेट, अशा एकूण ८ विकेट घेतल्या. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा स्पिनर यशस्वी होत असताना भारतानं मात्र ४ फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
भारतानं दुसऱ्या टेस्टमध्ये निवडलेल्या या टीमवर सुनील गावसकर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. भारतानं ही सीरिज गमावली तर विराट आणि रवी शास्त्रींच्या भूमिकेचीही समीक्षा व्हायला पाहिजे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरशिवाय असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला जर भारताला हरवता येत नसेल, तर कर्णधार, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा खरच फायदा होतोय का? याचा विचार निवड समितीनं करायला हवा, अशी बोचरी टीका गावसकर यांनी केली.
रवी शास्त्रींचं प्रत्युत्तर
सुनील गावसकर यांनी केलेल्या या टीकेला रवी शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाखो मैल लांब बसून टीका करणं सोपं असतं, असं शास्त्री म्हणाले. ते लांब बसून प्रतिक्रिया देत आहेत, पण आम्ही इकडे आहोत. टीमसाठी जे सर्वोत्तम असेल, ते आम्हाला करायचं आहे, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली.
राहुलला घरी पाठवा, सुनील गावसकर भडकले
ओपनर चिंतेचा विषय
भारताचे ओपनर केएल राहुल आणि मुरली विजय यांचा फॉर्म आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे. ओपनिंग बॅट्समनना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, असा इशारा शास्त्रींनी दिला. त्यांच्याकडे अनुभव असल्यामुळे ते त्यांचं योगदान देतील, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.
मयंक अग्रवालवर विचार सुरू
भारतीय टीम मयंक अग्रवालचा पर्याय म्हणून विचार करत असल्याचे संकेत रवी शास्त्रींनी दिले आहेत. मयंक एक चांगला खेळाडू आहे. भारत ए कडून खेळताना त्यानं खोऱ्यानं रन काढल्या आहेत. त्याचं रेकॉर्ड बघितलं तर ते कोणत्याही दुसऱ्या खेळाडू एवढंच चांगलं आहे. त्यामुळे मयंकबद्दल आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असं शास्त्री म्हणाले.