नवी दिल्ली : आज दुपारी तीन वाजता भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सामना रंगणार आहे. दरम्यान या लढतीवर पावसाचे गडद ढग दाटले असल्यानं पावसाचाच दमदार खेळ पाहावं लागण्याची दाट शक्यता आहे. वर्ल्डकप दरम्यान आत्तापर्यंत तीन मॅचवर पावसाचा प्रभाव राहिलाय. या तीन मॅचमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही तर तिसरी मॅच सुरू झाली पण ती कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचू शकली नाही. आज नॉटिंघममध्येही भारत-न्यूझीलंड मॅचदरम्यान पावसाचं सावट दिसून येतंय. या पावसाचा परिणाम मॅचवर कितपत होणार? हे दिसून येईलच. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी इथं ८० टक्के पावसाची शक्यता आहे.


भारत Vs न्यूझीलंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वकरंडक स्पर्धेत पहिले दोन सामने दिमाखात जिंकलेल्या भारतीय संघाचा आगामी सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यामुळे आता या लढतीत दोन्ही संघ आपली विजयी लय कायम राखण्याच्या इराद्यानंच मैदानात उतरतील. भारत आणि न्यूझीलंड या विश्वचषकातील आतापर्यंतचे हे अपराजित संघ नॉटींगघममध्ये आमने-सामने उभे ठाकतील. या सामन्यात पाऊस रंगाचा बेरंग करण्यासाठी अधिक सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. पावसाच्या व्यत्ययामुळेच दोन्ही संघाना नॉटींगहॅममध्ये दाखल झाल्यावर सरावावर पाणी सोडवं लागलंय.


या सामन्यापूर्वी शिखर धवनच्या रुपात भारताला मोठा धक्का बसलाय. धवनचा अंगठा दुखावला गेल्यानं या सामन्यात तो खेळणार नाही. यामुळे आता सलामीला आणि चौथ्या स्थानी मैदानात कोण उतरलं याची उत्सुकता क्रिकेटचाहत्यांना लागलीय. धवनचा हा धक्का सोडला तर इतर संपूर्ण संघ अगदी फिट ऍन्ड फाईन आहे. रोहित, विराट, हार्दिक, धोनी कांगारुंविरुद्धच्या आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करायला आतूर असतील. बुमराह आणि भुवी आपल्या वेगवान माऱ्यानं आणि चहल-कुलदीप आपल्या फिरकीनं किवी फलंदाजांना चकवण्याचा प्रयत्न करतील. न्यूझीलंड पुन्हा भारताला धक्का देण्याच्या तयारीत असतील. सराव सामन्यात न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं होतं. मात्र विश्वचषकापूर्वी भारतानं न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत धूळ चारली होता.


दरम्यान न्यूझीलंड संघानं विश्वचषकात सलग तीन विजय साकारलेत. श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानसारख्या संघांना किवींनी पराभूत केलंय. मात्र आता सामना भारतासारख्या दर्जेदार संघाशी आहे. यामुळे ते नक्कीच सावध असतील. मार्टीन गप्टील, कॉलिन मुनरो, केन विलियमसन, रॉस टेलर असे फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. तर जेम्स निशाम, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बाऊल्ट आणि ग्रँडहोम्मे यांना भारताच्या फलंदाजीला लगाम घालण्याचं आव्हान असेल. 


दोन्ही देशांमध्ये विश्वचषकात आतापर्यंत ७ मुकाबले झाले आहेत. यातील तीन सामने भारतानं तर ४ सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. 



दोन्ही देशांमध्ये एकूण १०६ सामने झाले असून भारतानं ५५ तर न्यूझीलंडनं ४५ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत राहिलाय तर पाच सामने अनिर्णित आहे. 


आता धवनच्या धक्क्यातून सावरत भारत विजयी लय कायम राखण्यासाठी तर न्यूझीलंड संघ सलग चौथ्या विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नीशील असेल...तिकडे या दोन्ही संघांपेक्षा दमदार खेळ करण्यासाठी वरुणराजाच सज्ज झालाय.