वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला आहे. रनच्याबाबतीत भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव आहे. खराब बॅटिंगमुळे भारताचा पराभव झाला असल्याची प्रतिक्रिया भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मानं दिली आहे. २२० रनचा पाठलाग करताना भारताचा १३९ रनवर ऑल आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचमधल्या निराशाजनक कामगिरीवर रोहित म्हणाला 'हा सामना कठीण होता. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये न्यूझीलंडनं आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. आमच्या बॅटिंगची सुरुवात खराब झाल्यामुळे २०० रनचा पाठलाग करणं सोपं नव्हतं. वारंवार विकेट गमावल्यामुळे आम्ही सामन्याच्या बाहेर गेलो. अशा आव्हानाचा आम्ही याआधीही पाठलाग केला आहे. या कारणासाठीच आम्ही ८ बॅट्समन घेऊन खेळलो. कोणत्याही आव्हानाचा पाठलाग करण्याचा विश्वास आमच्यामध्ये आहे, पण या मॅचमध्ये आम्ही भागिदारी करु शकलो नाही.'


या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी पुढच्या मॅचमध्ये चुका सुधारु, असा विश्वास रोहितनं व्यक्त केला. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यानं त्याच्या खेळाडूंचं कौतुक केलं. 'सायफर्ट आणि मुन्रोनं आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर डॅरिल मिचेलनंही चांगली बॉलिंग केली. बॅट्समनबरोबरच बॉलर आणि फिल्डरनीही त्यांचं योगदान दिलं', असं विलियमसन म्हणाला.


न्यूझीलंडच्या टीम सायफर्टनं ४३ बॉलमध्ये ८४ रनची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. कॉलीन मुन्रोनं २० बॉलमध्ये ३४ आणि कर्णधार केन विलियमसननं २२ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली. भारत आणि न्यूझीलंडमधली दुसरी टी-२० शुक्रवारी ऑकलंडमध्ये खेळवली जाईल.