हेमिल्टन : न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या सिरीजमधील पहिले तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा चौथ्या सामन्यात अपमानास्पद पराभव झाला आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ या सामन्यात कुठे चुकला, याची प्रमुख कारणे आपण पाहणार आहोत.


भारताची फलंदाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक सामन्यांपासून भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करत होते. पण चौथ्या सामन्यात फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. भारताने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. पण पहिला झटका 28 धावावंर बसला. शिखर धवन 13 धावा करुन बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर भारताचा डाव डगमगला. धवननंतर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. भारताच्या सलामीवीरांना चांगली खेळी करता आली नाही. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अंबाती रायुडुला भोपळा देखील फोडता आला नाही. तर दिनेश कार्तिक देखील फटका मारण्याच्या घाईत आपली विकेट गमावून बसला. संघात पदार्पण केलेल्या शुभमन गिल याला देखील विशेष काही करता आले नाही. शुभमन गिल 9 धावा करुन तंबूत परतला. 


भारतीयं संघ संकटात असताना केदार जाधवला मोठी खेळी करण्याची संधी होती, पण त्याला देखील या संधीचं सोनं करता आलं नाही. केदार जाधव अवघी 1 धाव करुन बाद झाला. यानंतर खालच्या फळीतील खेळाडूंनी भारताची अब्रु वाचवली. हार्दिक पांड्याने 16 धावा केल्या. तर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या 'कुलचा' जोडीने प्रत्येकी, 15 आणि 18 धावा केल्या. पांड्या, आणि 'कुलचा' जोडीच्या धावांमुळे भारताला न्यूझीलंडला 93 धावांचे लक्ष देता आले.


कोहली-धोनीची अनुपस्थिती


कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी आराम दिला आहे. तर धोनीला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले. त्याऐवजी संघात दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. तर मोहम्मद शमीच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली. शुभमन गिल या नव्या दमाच्या खेळाडूने भारतीय संघात पदार्पण केले. भारतीय संघ जेव्हा जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा तेव्हा कोहली आणि धोनी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण या सामन्यात हे दोघे नसल्याने भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.


बोल्टचा भेदक मारा


चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या कोणत्याही खेळाडूला टिकता आलं नाही. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याने शिखर धवन, रोहित शर्मा, शुभमन गिल, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या या पट्टीच्या फलंदाजांना माघारी पाठवले. बोल्टने 10 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा देत या 5 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे त्याने 4 ओव्हर मेडन टाकल्या.