नेपियर : भारत आणि न्यूझीलंडमधल्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच एकदिवसीय सामन्यामध्ये एक विचित्र प्रकार घडला. नेहमी पावसामुळे थांबवण्यात येणारा खेळ यावेळी चक्क सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला. सूर्यास्तावेळी भारतीय बॅट्समनच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश येत असल्यामुळे त्यांना बॉल दिसत नव्हता. त्यामुळे अंपायरनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडनं दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना ११व्या ओव्हरदरम्यान शिखर धवन बॅटिंग करत असताना त्याच्या डोळ्यात सूर्यप्रकाश येत होता. त्यामुळे शिखर धवनला बॉल दिसण्यात अडचण येत होती. अखेर अंपायरनी काही काळ खेळ थांबवण्याचं ठरवलं. नंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाल्यावर भारताला ४९ ओव्हरमध्ये १५६ धावांचं आव्हान मिळालं. अर्ध्या तासानंतर सामना पुन्हा सुरु झाला.


क्रिकेटच्या खेळपट्ट्यांची दिशा ही नेहमी उत्तर-दक्षिण अशी असते. यामुळे कधीच खेळाडूंना बॅटिंग करताना कधीच सूर्यप्रकाश डोळ्यात जात नाही. पण नेपियरच्या मैदानातली खेळपट्टी ही पूर्व-पश्चिम आहे. त्यामुळे एका एण्डवर बॅटिंग करणाऱ्या खेळाडूच्या डोळ्यात सूर्यप्रकाश थेट जातो. भारत-न्यूझीलंड मॅचमध्येही असाच प्रकार घडला.


माझ्या १४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी असा प्रकार पहिल्यांदाच बघितला अशी प्रतिक्रिया अंपायर शॉन हेग यांनी दिली. डुबत्या सूर्याचा प्रकाश बॅट्समनच्या डोळ्यात जात होता. त्यामुळे आम्ही खेळाडू आणि अंपायरच्या सुरक्षेच्या दृष्टीनं खेळ थांबवला, असं शॉन हेग म्हणाले.


क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनीही आपण असा प्रकार पहिल्यांदाच पाहिल्याचं म्हणलं. तसंच खेळपट्ट्या या उत्तर-दक्षिण दिशेलाच असाव्यात, असंही हर्षा भोगले म्हणाले. दरम्यान नेपियरमधली खेळपट्टी अशी का बांधण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर नेपियरचे महापौर बिल डॉल्टन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारे सूर्यप्रकाशाचा खेळाडूंना त्रास होईल, याची आम्हाला कल्पना होती. यासाठी आम्ही योजनाही तयार केली होती. मैदानामध्ये पहिले उंच स्टॅण्ड बांधण्याचं ठरलं होतं, ज्यामुळे खेळाडूंना सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही. पण आता आम्ही नवी योजना आखत आहोत, असं वक्तव्य नेपियरच्या महापौरांनी केलं.



न्यूझीलंडचा डाव १५७ धावांमध्ये संपुष्टात


याआधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याच्या ६४ रनच्या खेळीमुळे न्यूझीलंडला १५७ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहलला २ आणि केदार जाधवला एक विकेट मिळाली.