Inspirational story : महाराष्ट्रातील अनाथालयातील एक अनाथ मुलगी परदेशात जाते काय आणि एका देशाची कर्णधार होते काय... अगदी स्वप्नवत वाटणारी ही कहाणी.. ही कहाणी आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी बनली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 ऑगस्ट 1979 ला महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात एका मुलीचा जन्म झाला. पण त्या मुलीचं पालन पोषण करण्यास आई-वडिल काही कारणाने असमर्थ होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या मुलीला पुण्यातील श्रीवत्स अनाथालयातील पायऱ्यांवर अगदी पहाटे त्या मुलीला सोडून पलायन केलं. 


श्रीवस्त अनाथालयातील कर्मचाऱ्यांना ती मुलगी सापडली, त्यांनी त्या गोड मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि प्रेमाने तिचं नाव ठेवलं लैला. इतर मुलांबरोबर लैलाचंही तिथे पालन पोषण तिथे होत होतं. याच दरम्यान हरेन आणि सू नावाचं अमेरिकन जोडप भारत दौऱ्यावर आलं होतं. त्यांना एक मुलगी होती आणि भारतात येण्यामागचं त्यांचं प्रमुख उद्दीष्ट होतं एक मुलगा दत्तक घेणं.


मुलगा दत्तक घेण्याच्या शोधातच हे जोडप्याने पुण्यातील श्रीवत्स अनाथालयाला भेट दिली. त्यांनी मुलाबाबत चौकशी केली पण त्यांना अपयश आलं. याचवेळी सूची नजर लैलावर पडली. घारे डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहून सू या गोंडस मुलीच्या प्रेमातच पडली. तिने या मुलीबाबत चौकशी केली आणि तिला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली.


कायदेशीर प्रक्रियेनंतर हरेन आणि सू या जोडप्याने लैलाला दत्तक घेतलं. लैलाला घेऊन हे जोडपं अमेरिकेला गेलं. तिथे त्यांनी लैलाचं नाव बदलून लिसा (lisa sthalekar) ठेवलं. काही वर्षांनी हे कुटुंब ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये स्थायीक झालं.


हरेनला क्रिकेटची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी लिसाला क्रिकेट शिकवण्याचा निर्णय घेतला. लिसालाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. घरातल्या अंगणात वडिलांबरोबर क्रिकेटचे धडे गिरवणारी लिसा गल्लीतल्या मुलांबरोबरही क्रिकेट खेळू लागली. पण त्याचबरोबर लिसा अभ्यासातही प्रचंड हुशार होती. 


लिसाचं क्रिकेट केवळ गल्लीपुरताच मर्यादीत राहिलं नाही. क्रिकेटमधली तिची आवड आणि सातत्य यामुळे तिने एक एक टप्पा पार करत थेट ऑस्ट्रेलिय महिला क्रिकेट संघापर्यंत झेप घेतली. इतकंच नाही तर अल्पावधीतच तिने ऑस्ट्रेलिय महिला संघाची कर्णधार म्हणूनही मान मिळवला,


2001 मध्ये लिसा ऑस्ट्रेलियासाठी पहिली वन डे खेळली. त्यानंतर 2003 मध्ये पहिली टेस्ट तर 2005 मध्ये पहिला टी-20 सामना खेळली. लिसा ऑस्ट्रेलियासाठी तब्बल 125 वन डे सामने खेळली. यात तिने 2728 धावा केल्या आणि 146 विकेटही आपल्या नावावर केल्या. 


तर 8 टेस्ट सामन्यात लिसाच्या खात्यात 416 धावा आणि 23 विकेट जमा आहेत. याचबरोबर 54 टी-20 सामन्यात 769 धावा आणि 60 विकेट असा तिचा रेकॉर्ड आहे. 


आयसीसी महिला क्रिकेट रँकिंगमध्ये लिसा अव्वल स्थानावर होती. वन डे आणि टी-20 च्या चार वर्ल्ड कप स्पर्धेत लिसाने देशाचं प्रतिनिधित्व केलं. 2013 मध्ये लिसाच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला संघाने वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. हा तिच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू होता. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी लिसाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली.


आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC( लिसाचा समावेश हॉल ऑफ फेमध्येही (hall of fame cricket list) केला. जगभरातील महान क्रिकेटर्समध्ये आज लिसा स्थलेकरचं नाव आदराने घेतलं जातं.