चेन्नईला जिंकवून देणाऱ्या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी
आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये चेन्नईनं फॅप डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूरच्या शानदार कामगिरीमुळे विजय मिळवला.
मुंबई : आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये चेन्नईनं फॅप डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूरच्या शानदार कामगिरीमुळे विजय मिळवला. या विजयाबरोबरच चेन्नईची टीम फायनलमध्ये पोहोचली आहे. या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरनं ५ बॉलमध्ये ३ फोर मारून १५ रन केल्या. या महत्त्वाच्या १५ रनमुळेच चेन्नईला फायनल गाठता आली. शार्दुल ठाकूरसाठी २०१८ हे वर्ष चांगलं राहिलं आहे. श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आलेल्या निदहास ट्रॉफीमध्येही त्यानं चांगलं प्रदर्शन केलं. पालघरला राहणाऱ्या या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत.
१ शार्दुल ठाकूरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ साली पालघरमध्ये झाला. शार्दुलचे वडिल नरेंद्र ठाकूर नारळाचे व्यापारी आहेत. शाळेकडून क्रिकेट खेळताना शार्दुल ठाकूरनं ६ बॉलमध्ये ६ सिक्स लगावले होते.
२ शार्दुल ठाकूर रणजीमध्ये मुंबईकडून खेळतो. नोव्हेंबर २०१२ साली जयपूरमध्ये त्यानं राजस्थानविरुद्ध पहिली मॅच खेळली.
३ क्रिकेट खेळण्यासाठी शार्दुल ठाकूर पालघरवरून रोज मुंबईला लोकल ट्रेननं यायचा. सकाळी ७.३० वाजता मैदानात पोहोचायचं असल्यामुळे शार्दुलला सकाळी ३.३० वाजता उठायला लागायचं. मुंबईला येण्यासाठी तो सकाळी ४ वाजताची ट्रेन पकडायचा.
४ मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारताकडून खेळल्यानंतर शार्दुल ट्रेननंच घरी गेला. त्यावेळी शार्दूल ठाकूरला कोणीही ओळखलं नाही.
५. रोहित शर्माच्या नेतृत्वात २०१२-१३ साली रणजी ट्रॉफीमध्ये ठाकूरनं ६ मॅचमध्ये २६.२५ च्या सरासरीनं २७ विकेट घेतल्या. यात एकाच मॅचमध्ये ५ विकेटचाही समावेश आहे.
६ आयपीएलमध्ये २०१४ साली शार्दुल ठाकूरला पंजाबनं २० लाख रुपयांना खरेदी केलं होतं. दिल्लीविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये शार्दुल ठाकूरनं चार ओव्हरमध्ये ३८ रन देऊन एक विकेट घेतली होती.
७. शार्दुलनं पंजाबबरोबरच पुण्याकडूनही आयपीएल खेळलं आहे. यावर्षी शार्दुल चेन्नईकडून खेळत आहे.
८ २०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट दौऱ्यासाठी शार्दुलची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑगस्ट २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला संधी देण्यात आली.
९ सचिन तेंडुलकरनंतर १० क्रमांकाची जर्सी घालणारा शार्दुल ठाकूर एकमेव खेळाडू होता. १० क्रमांकाची जर्सी घातल्यामुळे शार्दुल ठाकूरवर टीकाही करण्यात आली होती.
१० जर्सीवरून झालेल्या टीकेमुळे शार्दुलनं त्याची १० क्रमांकाची जर्सी बदलली. २०१७ साली न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मॅचमध्ये शार्दुल ठाकूरनं ५४ क्रमांकाची जर्सी घातली.