मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकाची निवड व्हायला आणखी काही दिवसांचा वेळ लागू शकतो. तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती १५ ऑगस्टनंतर प्रशिक्षकपदासाठी उत्सुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. याआधी या मुलाखती १३ ते १४ ऑगस्टदरम्यान होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रशिक्षकपदासाठी ६ उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत, या सगळ्यांचा मुलाखती एकाच दिवशी होतील, अशी माहिती सूत्रांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही कागदोपत्री होणाऱ्या गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाहीत. या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर क्रिकेट सल्लागार समिती मुलाखतींच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. १५ ऑगस्टआधी कागदपत्रांची पूर्तता होणार नाही, असं दिसत आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.


या प्रक्रियेमध्ये कर्णधाराचा समावेश असेल, असं मला वाटत नाही. कारण मार्गदर्शक तत्त्वांनुसार यामध्ये कोणाचा सहभाग असेल आणि कोणाचा नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करायची हे क्रिकेट सल्लागार समितीवर अवलंबून आहे. यामध्ये कर्णधार किंवा प्रशासकीय समितीची भूमिका नसेल. हीच प्रक्रिया महिला टीमच्या प्रशिक्षकाची निवड होतानाही अवलंबली गेली होती, अशी माहिती सूत्राने दिली. 


क्रिकेट सल्लागार समिती मुलाखतीनंतर प्रशिक्षकपदासाठीची नावं बीसीसीआयला सुचवेल, यानंतर बीसीसीआय कोणाची निवड करायची ते ठरवेल, असं सूत्राने सांगितलं.


वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधार विराट कोहलीने सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याच नावाला पसंती दिली होती. रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाले तर मला आवडेल, असं विराट म्हणाला होता.