India vs Australia : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलचा बदला घेतलाय. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कांगारुंना टाटा गुड बाय केलं आहे. रोहित अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. अशातच आता भारताचा विजय पाकिस्तानच्या पचनी पडला नाहीये. इंझमाम-उल-हक आणि सलीम मलिक यांनी ऑस्ट्रेलियन डावात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळालेल्या रिव्हर्स स्विंगवर आक्षेप घेतला आहे. त्यावेळी त्यांनी धक्कादायक आरोप देखील केलेत. मात्र, पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचे जावई शोध ऐकून कोणालाही हसू आवरणार नाही.


काय म्हणाला इंझमाम-उल-हक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंझमामने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळालेल्या रिव्हर्स स्विंगसाठी आक्षेप घेतला आहे. 15 व्या षटकात अर्शदीपने टाकलेला चेंडू रिव्हर्स स्विंग झाला होता. यावरून इंझमामने जावई शोध लावलाय. 12 आणि 13 व्या ओव्हरमध्ये बॉल रिव्हर्स स्विंग कसा काय होईला लागला? असा सवाल इंझमामने विचारला. मी जेव्हा बॉल रिव्हर्स होताना पाहिला तेव्हा मला धक्काच बसला, असंही इंझमामने सांगितलं. भारताने बॉल टेम्परिंग केली आहे की नाही? यावर पंचांकडून चौकशी व्हावी अशी मागणी देखील इंझमामने केली आहे.


सलीम मलिकने देखील इंझमामच्या मतावर सहमती दर्शवली. फक्त आमच्या संघावरच का तपासण्याच्या गोष्टी आहेत? भारत आणि इतर संघांना का सूट मिळते? असं सलीम मलिक म्हणाला. आमच्या कोणत्या खेळाडूने असा रिव्हर्स स्विंग केला असता तर मोठा मुद्द्या झाला असता, असं म्हणत इंझमामने नाराजी व्यक्त केली. त्यात सलीमने देखील सूर मिळवले.


दरम्यान, पाकिस्तानचे हे बोबडे बोल नवे नाहीत. वर्ल्ड कप सुरू होण्याआधी देखील पाकिस्तानकडून बिनबुडाचे आरोप केले जातात. भारतीय गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू दिले जात आहेत, ज्यामुळे गोलंदाजांना अधिक सीम आणि स्विंग मिळत आहेत, असा आरोप देखील माजी क्रिकेटपटू हसीन रझाने केला होता. मात्र, वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर पाकिस्तान बावचळलंय की काय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.