`मी कुलदीप यादवला संघात घेऊ शकत नाही कारण...`; इंझमामचा पत्रकारांसमोर खुलासा
Inzamam ul Haq On Kundeep Yadav: पत्रकारांनी इंझमाम उल हकला कुलदीप यादवचा उल्लेख करत प्रश्न विचारला. हा संपूर्ण प्रश्न ऐकून घेतल्यानंतर पाकिस्तानच्या निवड समिती प्रमुखांनी उत्तर दिलं.
Inzamam ul Haq On Kundeep Yadav: नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने भारताला जेतेपदापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. कुलदीपच्या फिरकीमध्ये वेगवेगळ्या संघांचे फलंदाज चांगलेच गुरफटले गेले. श्रीलंकेमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतात सुरु झालेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कुलदीप यादवला विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यांबरोबर आराम देण्यात आला. भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी वर्ल्डकपमध्ये कुलदीप यादव हा आमचा हुकूमी एक्का असेल असं म्हटलं आहे. मात्र पाकिस्तानी संघाच्या निवड समितीचे प्रमुख असलेल्या इंजमाम उल हक यांनी कुलदीप यादव संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अगदीच भन्नाट उत्तर दिलं आहे. पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांच्या आकडेवारीशी कुलदीपच्या कामगिरीची तुलना करत हा प्रश्न विचारण्यात आला होता.
कुलदीपची निवड करु शकत नाही
पाकिस्तानच्या वर्ल्डकप स्पर्धेच्या संघात मोम्मद नवाज आणि शादाब खान हे 2 फिरकी गोलंदाज आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये कुलदीप यादवच्या कामगिरीची मोहम्मद नवाज आणि शादाबच्या कामगिरीशी तुलना करत प्रश्न विचारला गेला. सर्व आकडेवारी ऐकून घेतल्यानंतर इंझमाम यांनी सर्व आकडेवारीबरोबर असली तरी आपण पाकिस्तीनी क्रिकेट संघासाठी कुलदीपची निवड करु शकत नाही असं म्हटलं. यामागील कारण देताना त्यांनी तो (कुलदीप) आधीपासूनच भारतासाठी खेळतोय, असं म्हटलं. हे उत्तर ऐकून सर्वच उपस्थित पत्रकार हसू लागले.
आम्ही त्या दोघांना निवडलं कारण...
"तुम्ही दोन्ही गोलंदाजांबद्दलची चांगली माहिती आणि आकडेवारी मांडली आहे. मात्र मी हे सांगू इच्छितो की मी कुलदीप यादवची निवड करु शकत नाही. माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण ही आहे की तो दुसऱ्या संघातून खेळतो," असं इंझमाम यांनी म्हणत पत्रकाराला उत्तर दिलं. "आम्ही शादाब आणि नवाजला निवडलं आहे कारण आम्हाला सातत्य कायम ठेवायचं आहे. वर्ल्डकपसाठीचे संघ वर्षभर आधीच ठरतात. ते अचानक बदलता येत नाहीत. हे दोघेही मागील 2 वर्षांपासून उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांना सामन्यांच्या मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेता येत नाहीत. तसेच ते त्यांच्या पूर्ण क्षमतेनं कामगिरी सध्या करत नसले तरी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे," असं इंझमाम यांनी सांगितलं.
उपकर्णधार कोण?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह जायबंदी झाल्याने तो वर्ल्डकप स्पर्धा खेळणार नाही. मात्र पाकिस्तानचा ज्येष्ट खेळाडू हसन अलीला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. पाकिस्तानी संघाचं नेतृत्व बाबर आझम करणार असून उपकर्णधार पद शादाब खानकडे आहे.
वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आजम (कर्णधार) फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान, सउद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, मोहम्मद नवाज, शादाब खान, उसामा मीर, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली