जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवार १८ डिसेंबरला होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच हा लिलाव जयपूरमध्ये होईल. आयपीएलच्या लिलावासाठी जवळपास १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी निवडली, आणि ही यादी आयपीएल कार्यकारी परिषदेला दिली. लिलावासाठी निवडण्यात आलेल्या ३४६ खेळाडूंपैकी ९ खेळाडूंची बेस प्राईज २ कोटी रुपये आहे. यात सॅम कुरन, ब्रॅण्डन मॅक्कलम, क्रिस वोक्स, लसीथ मलिंगा, शॉन मार्श, कोलीन इंग्राम, कोरे अंडरसन, एंजलो मॅथ्यूज आणि डी आर्सी शॉर्ट यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी जयदेव उनाडकटवर ११.५ कोटी रुपयांची बोली लागली होती. राजस्थानच्या टीमनं उनाडकटला विकत घेतलं होतं. मागच्या वर्षीच्या लिलावात उनाडकट सर्वाधिक बोली लागलेला भारतीय खेळाडू होता. पण निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थाननं त्याला टीमबाहेर केलं. यावर्षी उनाडकटची बेस प्राईज १.५ कोटी एवढी आहे.


१.५ कोटीच्या यादीत जयदेव उनाडकटसोबत ९ परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्कल आहेत. १ कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये एकूण ४ भारतीयांसोबत १९ खेळाडू समाविष्ट आहेत. युवराज सिंग, अक्सर पटेल आणि मोहम्मद शमी यांची बेस प्राईज १ कोटी रुपये आहे. २०१५ साली युवराज सिंग तब्बल १६ कोटी रुपयांना विकला गेला होता. तर २०१८ मध्ये युवराजची बेस प्राईज २ कोटी रुपये होती.


७५ लाख रुपयांच्या बेस प्राईजच्या यादीत २ भारतीयांसह १८ खेळाडू आहेत. यामध्ये ईशांत शर्माचा समावेश आहे. याशिवाय ५० लाखांच्या बेस प्राईजमध्ये ६२ खेळाडूंपैकी १८ भारतीय आणि ४४ परदेशी खेळाडू आहेत.


आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या लिलावात ७ असे खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच लिलावात उतरणार आहेत आणि या खेळाडूंची बेस प्राईज ४० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


३० लाख रुपये बेस प्राईज असलेल्या ८ खेळाडूंमध्ये ५ भारतीय आणि ३ परदेशी खेळाडू आहेत. या ८ खेळाडूंचा पहिल्यांदाच लिलाव होणार आहे. २० लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या यादीत २१३ खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच लिलावात उतरतील. या २१३ खेळाडूंपैकी १९६ भारतीय आणि १७ परदेशी खेळाडू आहेत.


लिलावात सगळ्या ८ टीमचा समावेश


आयपीएलच्या या लिलावामध्ये चेन्नई, राजस्थान, हैदराबाद, पंजाब, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता या आठही टीम सहभागी होणार आहेत.


किती वाजता सुरु होणार लिलाव?


आयपीएल २०१९ साठीचा लिलाव दुपारी २.३० वाजता सुरु होईल आणि रात्री ९.३० वाजता संपेल.


कुठे पाहता येणार लाईव्ह प्रसारण?


आयपीएलच्या लिलावाचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवरही पाहता येईल.


24taas.com वर आयपीएलचे लाईव्ह अपडेट्स


याचबरोबर 24taas.com वर तुम्हाला आयपीएलचे सगळे लाईव्ह अपडेट्स मराठीमध्ये सगळ्यात जलद पाहायला मिळतील.