चेन्नई : आयपीएलच्या 12 व्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. या पर्वातील पहिली मॅच चेन्नई आणि बंगळूरु या टीममध्ये रंगणार आहे. ही मॅच चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिएम मध्ये खेळण्यात येणार आहे. या मॅचला रात्री 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या प्रत्येक पर्वाची सुरुवात ही उद्घाटन सोहळ्याने होते. परंतु यावेळेस हा उद्घाटन सोहळा होणार नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिल्या मॅचच्या तिकीट विक्रीतून जमा होणारी रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटूंबियांना देण्याचा निर्णय चेन्नई टीमने घेतला आहे. 


बंगळूरु आणि चेन्नई या टीममध्ये आतापर्यंत एकूण 23 मॅच झाल्या आहेत. यापैकी 15 मॅच या चेन्नईने जिंकल्या आहेत. तर बेंगळूरुला 7 मॅच जिंकण्यास यश आले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर या टीम 7 वेळा आमनेसामने आल्या आहेत. यापैकी 6 मॅच चेन्नईने जिंकल्या आहेत. त्यामुळे होम ग्राऊंडवरील चेन्नईचा रेकॉर्ड शानदार आहे. गेल्या 9 वर्षांपासून बंगळुरुला या मैदानावर चेन्नईचा पराभूत करता आलेले नाही.


बंगळूरुच्या कामगिरीवर लक्ष


बंगळूरुची बॅटिंग ही त्यांची मोठी ताकद आहे. बंगळूरुकडे एबी डी व्हिलियर्स आणि  विराट कोहली यासारखे स्फोटक खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये कोणत्याही क्षणी आपल्या टीमला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. बंगळूरुच्या टीमला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही. बंगळूरु टीमने  2009, 2011 आणि 2016 ला फायनलमध्ये धडक मारली होती. परंतू एकदाही बंगळूरुला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे या पर्वात बंगळूरुला विजेतपद मिळवण्याचा मानस असेल.


तसेच बंगळूरु टीमच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम आहे. बंगळूरु टीमला आतापर्यंत आयपीएलच्या पर्वामधील सलामीची मॅच जिंकता आलेली नाही. याआधी बंगळूरु टीमने 2008 आणि 2017 च्या आयपीएल पर्वातील पहिल्या मॅचमध्ये कोलकाता आणि हैदराबाद कडून पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे पहिली मॅच जिंकून हा विक्रम मोडीत काढण्याचा विचार बंगळूरु  टीमचा असेल.     


चेन्नईच्या टीममध्ये  अनेक अनुभवी खेळाडू आहेत. टीममध्ये महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन यासारखे तगडे आणि अनुभवी खेळाडू आहेत. चेन्नईने आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या 11 पर्वापैंकी 3 पर्वांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.    


बंगळूरु  टीम : विराट कोहली (कॅप्टन), एबी डी व्हिलियर्स, पार्थिव पटेल , मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.


चेन्नई टीम  : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, एन. जगदीशन