IPL 2019 : प्रिया वारियर नव्हे, `ही` आहे नवी `नॅशनल क्रश`
बंगळुरूच्या संघाची ही चाहती आयपीएल सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून गेली.
मुंबई : IPL 2019 चा यंदाचा हंगाम सुरु झाला तेव्हापासूनच तो आकर्षणाचे काही मुद्दे चर्चेत आणणारा ठरला. एखाद्या खेळाडूचा अंदाज असो किंवा त्या अमुक एका संघाची मैदानाबाहेरची धमाल असो. आयपीएल म्हटलं की मनोरंजनाची मेजवानीच प्रेक्षकांना आणि मुख्यत्वे क्रीडारसिकांच्या भेटीला येते. अशाच या आयपीएलच्या शनिवारच्या सामन्यात बंगळुरू आणि हैदराबादच्या संघांनी क्रीडारसिकांची मनं जिंकलीच. पण, त्यातही खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ती म्हणजे चाहत्यांच्या गर्दीत बसलेली एक तरुणी.
मैदानात कॅमेरा जेव्हा उपस्थित चाहत्यांपाशी येतो तेव्हा मोठया स्क्रीनवर येण्याचाच आनंद चाहत्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. असाच आनंद त्या तरुणीच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळाला, जेव्हा तिच्यावर कॅमेराची नजर गेली. पण, मुख्य म्हणजे संपूर्ण सामन्यादरम्यानच बंगळुरूची ही जबरा फॅन अनेकांच्या मनात तिच्या निरागस सौंदर्याने घर करुन गेली होती.
सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल होण्यास विलंब लागत नाही, याचच उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कारण, पाहता पाहता क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेली हीच तरुणी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. तिचं हसणं आणि मोठ्या उत्साहात बंगळुरूच्या संघाला प्रोत्साहित करणं हेसुद्धा तितकच लक्षवेधी ठरलं. एका अर्थी प्रिया प्रकाश वारियर ज्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे 'इंटरनेट सेन्सेशन', 'नॅशनल क्रश' वगैरे झाली होती, तिच्यावर मात करत आता विराटच्या संघाची ही चाहतीसुद्धा त्याच वाटेवर चालत असल्याचं पाहायला मिळालं.
छायाचित्र, टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांनीच तिच्याविषयी ट्विट करण्यास सुरुवात केली. खुद्द त्या तरुणीनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक बुमरणग व्हिडिओ पोस्ट केला. दीपिका या नावाने तिचं हे इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू असून, #theRCBgirl असं तिने या अकाऊंटच्या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलं आहे. तिच्या फॉलोअर्सचा आकडाही रातोरात वाढला आहे. इतकच नव्हे तर तिच्या नावे काही बनावट अकाऊंटही सुरू केल्याचं कळत आहे. पण, प्रसिद्धीझोतात आलेल्या दीपिकानेच आपल्या खऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटची माहिती देत याविषयीच्या शंकांचं निरसन केलं आहे. ही नवी 'नॅशनल क्रश' तुम्ही पाहिली का ?