IPL 2019: कोलकाता, पंजाबचा `रडीचा डाव`, मोहम्मद कैफ नाराज
आयपीएलमधल्या दिल्लीच्या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ याने पंजाब आणि कोलकात्याच्या टीम विषयी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : आयपीएलमधल्या दिल्लीच्या टीमचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ याने पंजाब आणि कोलकात्याच्या टीम विषयी नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही दुखापत झालेली नसताना खराब फिल्डरऐवजी बदली खेळाडू म्हणून मैदानात चांगल्या खेळाडूंना आणलं जात आहे. हे टाळण्यासाठी नवीन नियम बनवण्यात यावा, अशी मागणी मोहम्मद कैफ याने केली आहे. याबद्दल आम्ही संबंधित व्यक्तींशी बोलणार आहोत, असंही कैफने सांगितलं.
खराब फिल्डरना पॅव्हेलियनमध्ये पाठवून चांगल्या फिल्डरना मैदानात बोलावलं जात आहे, असा आरोप करताना मोहम्मद कैफने काही दाखलेही दिले. 'दिल्ली आणि कोलकातामधल्या मॅचवेळी पियुष चावला ४ ओव्हर टाकून पॅव्हेलियनमध्ये गेला. पियुष चावलाऐवजी रिंकू सिंग फिल्डिंगला आला,' असं कैफ म्हणाला.
३० वर्षांचा पियुष चावला हा काही सर्वोत्तम फिल्डर नाही. तर २१ वर्षांचा रिंकू सिंग हा चपळ फिल्डर आहे. पियुष चावलापेक्षा रिंकू सिंगची फिल्डिंग नक्कीच उजवी आहे.
दिल्ली आणि पंजाबविरुद्धच्या मॅचवेळीही असंच झाल्याचं वक्तव्य कैफने केलं आहे. मैदानात चपळ नसलेला पंजाबचा सरफराज खान फिल्डिंगला आला नाही. कैफने सरफराज खानच्या दुखापतीवरही संशय व्यक्त केला आहे. सरफराजची दुखापत किती गंभीर होती? रणनिती म्हणून सरफराज खानऐवजी करुण नायरला फिल्डिंगला पाठवण्यात आलं का? असे सवाल कैफने उपस्थित केले आहेत.
'दिल्लीविरुद्धच्या मॅचवेळी बॅटिंग करताना पंजाबच्या सरफराज खानच्या हाताला बॉल लागला होता. दुखापत झाल्यामुळे सरफरजा फिल्डिंगला येऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. पण बॉल सरफराजच्या ग्लोव्हजला लागला होता. या टीम चलाखी दाखवत असल्या तरी हे योग्य नाही. याबद्दल आम्ही अंपायरकडे दाद मागू', अशी प्रतिक्रिया कैफने दिली.