म्हणून आयपीएलची भव्य ओपनिंग सेरेमनी यंदा रद्द
२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
मुंबई : २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये नेहमी होते तशी भव्य ओपनिंग सेरेमनी होणार नाही. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ पेक्षा जास्त जवान शहीद झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीएलची ओपनिंग सेरेमनी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून बीसीसीआय राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी २० कोटी रुपयांची मदत देणार आहे. २३ मार्चला आयपीएलच्या पहिल्या दिवशी भारतीय सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. त्यावेळी ही रक्कम त्यांच्याकडे दिली जाईल. ओपनिंग सेरेमनीवर खर्च करण्याऐवजी बीसीसीआय हीच रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी देणार आहे.
२३ मार्चला आयपीएलची पहिली मॅच चेन्नई सुपरकिंग आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की 'प्रशासकीय समितीने राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी २० कोटी रुपये द्यायला मंजुरी दिली आहे. यावेळी आयपीएलचं उद्घाटन भव्य असणार नाही. मागच्या वर्षी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीचा खर्च १५ कोटी एवढा झाला होता. यावर्षी खर्चाची रक्कम २० कोटी एवढी करण्यात आली. पण ही रक्कम आता राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी दिली जाईल.'