IPL 2019: प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या, मुंबईचा सामना चेन्नईशी
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने विजय झाला.
मुंबई : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली आहे. तसंच मुंबईच्या विजयामुळे कोलकात्याचं प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न भंगलं आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. आयपीएलच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये प्ले-ऑफच्या टीम ठरल्या आहेत.
आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच १२ पॉईंट्ससह एखादी टीम प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे. हैदराबादचा १४ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय आणि ८ मॅचमध्ये पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद चौथ्या क्रमांकाची टीम ठरली. तर १४ मॅचपैकी ९ विजय आणि ५ पराभवासह मुंबईच्या खात्यात १८ पॉईंट्स झाले. मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिली. मुंबईएवढेच विजय आणि पराभव झालेली चेन्नईची टीम नेट रनरेटमुळे दुसऱ्या क्रमांकावर आणि दिल्लीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
प्ले-ऑफचं वेळापत्रक
प्ले-ऑफमध्ये पहिला क्वालिफायर सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. ७ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये या सामन्याला सुरुवात होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. तर ८ मे रोजी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एलिमिनेटर मॅच होईल. विशाखापट्टणममध्ये संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती टीम बाहेर जाईल. तर शुक्रवार १० मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. मुंबई आणि चेन्नईच्या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल त्या टीमचा सामना दिल्ली-हैदराबाद मॅचमधल्या विजयी टीमशी होईल. क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवलेली टीम रविवारी १२ मे रोजी आयपीएलची फायनल खेळेल.
७ मे २०१९- क्वालिफायर-१- मुंबई विरुद्ध चेन्नई- एम.ए.चिदंबरम स्टेडियम, चेन्नई- संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे २०१९- एलिमिनेटर- दिल्ली विरुद्ध हैदराबाद- व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम- संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे २०१९- क्वालिफायर-२- क्वालिफायर-१ची पराभूत टीम विरुद्ध एलिमिनेटरची विजेती टीम- व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम- संध्याकाळी ७.३० वाजता
१२ मे २०१९- फायनल- क्वालिफायर-१ विरुद्ध क्वालिफायर-२- व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम- संध्याकाळी ७.३० वाजता