जयपूर : अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकानंतरही दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये राजस्थानचा पराभव झाला. ऋषभ पंतने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे अजिंक्य रहाणेचं शतक वाया गेलं. ऋषभ पंतने ३६ बॉलमध्ये ७८ रन केले. ऋषभ पंतने ६ फोर आणि ४ सिक्स मारले. या कामगिरीबद्दल ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या मॅचनंतर ऋषभ पंतने पहिल्यांदाच वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मागच्या काही दिवसांपासून माझी कामगिरी चांगली होत नव्हती. वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड न झालेली गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती', असं पंत म्हणाला. 'टीमच्या विजयामध्ये योगदान दिल्याबद्दल मी समाधानी आहे. मी खोटं बोलणार नाही, पण वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेली गोष्ट माझ्या डोक्यात होती. मी खेळावर लक्ष केंद्रीत केलं, याचा फायदा मला झाला. जयपूरमधली खेळपट्टी चांगली होती,' असं वक्तव्य ऋषभ पंतने केलं.


३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी १५ खेळाडूंच्या भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. या टीममध्ये ऋषभ पंतला संधी देण्यात आली नाही, त्यामुळे अनेक दिग्गजांनी यावर टीका केली. यामध्ये दिल्ली टीमचा सल्लागार सौरव गांगुलीचाही समावेश होता.


आयपीएलच्या या मोसमामध्ये पंतने ११ मॅचमध्ये ३७.३३ च्या सरासरीने ३३६ रन केले आहेत. राजस्थानविरुद्धची ही खेळी या मोसमातली पंतची सर्वश्रेष्ठ खेळी होती. मागच्या मोसमात पंतने १४ मॅचमध्ये तब्बल ६८४ रन केले होते. प्लेऑफच्या आधी पंत हा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. पण या मोसमात पंतची बॅट जास्त चालली नाही.