आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा
२०१९ सालच्या आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमधला पहिला सामना हा गतविजेती चेन्नई आणि बंगळुरूमध्ये होणार आहे. तर मुंबईचा पहिला सामना हा दिल्लीशी २४ मार्चला होईल. २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे यंदाच्या वर्षी आयपीएलचं फक्त पहिल्या २ आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या २ आठवड्यांमध्ये २३ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान १७ सामने खेळवण्यात येतील. निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर आयपीएलच्या या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
आयपीएलच्या या वेळापत्रकानुसार ८ ठिकाणी प्रत्येकी २ मॅच होणार आहेत. तर दिल्लीमध्ये ३ सामने खेळवण्यात येतील. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक टीम कमीत कमी ४ मॅच खेळणार आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू ५ मॅच खेळणार आहेत. दिल्लीची टीम घरच्या मैदानात ३ आणि बंगळुरूची टीम बाहेरच्या मैदानात ३ सामने खेळेल. उरलेल्या टीम घरी २ आणि बाहेरच्या मैदानात २ सामने खेळतील.
यंदाच्या वर्षी संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांवर उरलेलं वेळापत्रक घोषित करण्यात येईल. २३ मार्चला चेन्नई आणि बंगळुरूमध्ये चेन्नईच्या मैदानात पहिला सामना रंगेल. तर आयपीएलची फायनलही चेन्नईमध्येच होईल.
कोणीही अध्यक्ष नसलेली यावेळची आयपीएलची ही पहिलीच स्पर्धा असेल. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं नव्या संविधानानुसार सगळ्या समित्या विघटित केल्या आहेत.