IPL 2019: मुंबईला धक्के, दोन खेळाडू मायदेशी परतणार
यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईला दोन मोठे धक्के बसले आहेत.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मुंबईला दोन मोठे धक्के बसले आहेत. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये फोर वाचवताना मुंबईचा फास्ट बॉलर अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली. अल्झारी जोसेफचा खांदा निखळला असून तो या आयपीएलमध्ये आता खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिलनेला दुखापत झाल्यामुळे मुंबईने अल्झारी जोसेफची टीममध्ये निवड केली. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये अल्झारी जोसेफने विक्रमाला गवसणी घातली. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये जोसेफने १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या. आत्तापर्यंतच्या आयपीएलमधली ही कोणत्याही बॉलरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मात्र जोसेफने खोऱ्याने रन दिल्या. जोसेफच्या ३ ओव्हरमध्ये राजस्थानच्या बॅट्समननी ५३ रन कुटल्या. पण बाऊंड्री अडवताना खांदा निखळल्यामुळे जोसेफला मैदान सोडून जावं लागलं.
अल्झारी जोसेफला दुखापत झालेली असतानाच मुंबईचा दुसरा फास्ट बॉलर जेसन बेहरनडॉर्फही ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. जेसन बेहरनडॉर्फची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २ मेपासून कॅम्पचं आयोजन केलं आहे. यासाठी बेहरनडॉर्फ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
बेहरनडॉर्फबरोबरच स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचीही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड झाल्यामुळे तेदेखील या कॅम्पमध्ये सहभागी होतील. त्यामुळे वॉर्नरला हैदराबादच्या टीमला आणि स्मिथला राजस्थानच्या टीमला सोडून जावं लागेल. बंगळुरूचा मार्कस स्टॉयनिसही या कॅम्पला जाईल. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली मॅच १ जूनला अफगाणिस्तानबरोबर आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई १० पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.