शारजाह : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. यावरुनच गंभीरने धोनीवर टीका केली. खालच्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन धोनीने नेतृत्व केलं नाही. जर दुसरा कर्णधार असता तर यावर बरीच टीका झाली असती, पण धोनी असल्यामुळे लोकं याबद्दल बोलतही नाहीयेत, असं गंभीर म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीने सॅम कुरन, ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधवला बॅटिंगला पाठवलं. 'खरं सांगायचं झालं तर मी हैराण आहे. एमएस धोनी सातव्या क्रमांकावर. ऋतुराज गायकवाड आणि सॅम कुरन त्याआधी. याचा काय अर्थ आहे? तुम्हाला नेतृत्व केलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली. 


२१७ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना फॅफ डुप्लेसिस एकटा किल्ला लढवत होता, असंही गंभीर म्हणाला. दरम्यान धोनीने सातव्या क्रमांकावर बॅटिंगला यायचं कारण सांगितलं आहे. वर्षभरापेक्षा जास्त काळ मी क्रिकेट खेळलो नाही. युएईमधल्या क्वारंटाईन काळामुळेही फारशी मदत झाली नसल्याचं धोनी म्हणाला. 


'लवकर आऊट होण्यात काहीही वाईट नाही. कमीत कमी तुम्ही टीमला प्रेरित तरी करता. शेवटच्या ओव्हरला धोनीने लागोपाठ ३ बॉलला ३ सिक्स मारले. जर आधीच हे केलं असतं तर मॅचचा निर्णय वेगळा लागला असता,' असं मत गंभीरने व्यक्त केलं. 


'पहिल्या ६ ओव्हरनंतरच चेन्नईने आशा सोडल्याचं पाहायला मिळालं. एमएस धोनी शेवटपर्यंत टिकून मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता. कारण पुढच्या मॅचमध्ये अशा खेळी करता येऊ शकतील. तुम्ही धोनीच्या ३ सिक्सबद्दल बोलू शकता, पण मग त्याचा काय फायदा? हे त्याचे वैयक्तिक रन होते,' असं वक्तव्य गंभीरने केलं.