मुंबई : २०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये होणार आहे. सुरुवातीला ९९७ खेळाडूंनी या लिलावासाठी नाव नोंदवलं होतं. पण सगळ्या ८ टीमनी एकूण ३३२ खेळाडूंसाठी पसंती नोंदवली. त्यामुळे उरलेल्या खेळाडूंचा लिलावासाठी विचार केला जाणार नाही. या ८ टीमनी एकूण ३३२ खेळाडूंना पसंती दिली असली तरी फक्त ७३ खेळाडूंचाच लिलाव होणार आहे, कारण सगळ्या ८ टीमकडे फक्त ७३ खेळाडू घेऊ शकतील एवढाच कोटा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल लिलावात ७ परदेशी खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज सर्वाधिक म्हणजेच २ कोटी रुपये एवढी ठेवली आहे. यामध्ये पॅट कमिन्स, जॉस हेजलवूड, क्रिस लीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन, एन्जलो मॅथ्यूज यांचा समावेश आहे.


परदेशी खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा केसरिक विलियम्स, बांगलादेशचा मुशफिकुर रहीम, ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झम्पा, इंग्लंडचा सॅम कुरन आणि न्यूझीलंडचा कॉलिन डिग्रॅण्डहोम यांच्यावरही पैशांचा वर्षाव होऊ शकतो. इंग्लंडचा युवा विकेट कीपर टॉम बॅण्टन याची बेस प्राईज १ कोटी रुपये आहे. लिलावामध्ये त्याच्यावरही मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कोलकात्याने बाहेर केलेला रॉबिन उथप्पा हा १.५० कोटी बेस प्राईज असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. याशिवाय पियुष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनाडकट यांची बेस प्राईज १ कोटी रुपये आहे. मागच्या लिलावात सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला जयदेव उनाडकटने त्याची बेस प्राईज ५० लाख रुपयांनी कमी केली आहे. मागच्या लिलावात उनाडकटला राजस्थानने ८.४ कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं.


अनकॅप भारतीय खेळाडूंमध्ये अंडर-१९ टीमचा कर्णधार प्रियम गर्ग आणि यशस्वी जयस्वाल यांच्यावर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. १८६ भारतीय खेळाडू, १४३ परदेशी खेळाडू आणि ३ सहकारी देशांचे खेळाडू या लिलावात सहभागी आहेत.


टीम रक्कम खेळाडूंची जागा
चेन्नई १४.६० कोटी रुपये ५ (२ परदेशी)
दिल्ली २७.८५ कोटी रुपये ११ (५ परदेशी)
पंजाब ४२.७० कोटी रुपये ९ (४ परदेशी)
कोलकाता ३५.६५ कोटी रुपये ११ (४ परदेशी)
मुंबई १३.०५ कोटी रुपये ७ (२ परदेशी)
राजस्थान २८.९० कोटी रुपये ११ (४ परदेशी)
बंगळुरू २७.९० कोटी रुपये १२ (६ परदेशी)
हैदराबाद १७ कोटी रुपये ७ (२ परदेशी)