मुंबई : आयपीएल २०२० साठी बीसीसीआय नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमामुळे आयपीएलमधला रोमांच आणखी वाढवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. २०२० सालच्या आयपीएल मोसमात 'पॉवर प्लेयर' या नियमाचा वापर होऊ शकतो, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. पॉवर प्लेयरच्या नियमाला बीसीसीआयची आधीच परवानगी मिळाली आहे. पण मंगळवारी मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या बैठकीत या नियमावर चर्चा केली जाईल.


कसा असेल पॉवर प्लेयरचा नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉवर प्लेयरचा नियम लागू झाला तर टीम टॉसवेळी ११ खेळाडूंऐवजी १५ खेळाडूंची घोषणा करतील. विकेट पडल्यानंतर किंवा ओव्हर संपल्यानंतर टीम खेळाडूंना बदलू शकतील. आयपीएलमध्ये हा नियम आणण्याआधी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत याची सुरुवात केली जाऊ शकते, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईच्या टीमला विजयासाठी २० रनची गरज आहे. पण कायरन पोलार्ड दुखापतीमुळे डग आऊटमध्ये बसला आहे. अशावेळी अंतिम-११ खेळा़डूंमध्ये नसतानाही कायरन पोलार्डला या नियमानुसार शेवटच्या ओव्हरसाठी बॅटिंगला बोलावलं जाऊ शकेल.


दुसरीकडे जर मुंबईची बॉलिंग सुरु असताना जर विरोधी टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ६ रनची गरज आहे आणि बुमराह डगआऊटमध्ये बसला आहे, तर अशा वेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम-११ मध्ये नसलेल्या बुमराहचा पॉवर प्लेयर म्हणून वापर करुन त्याला शेवटची ओव्हर देऊ शकतो.