IPL 2020 : आयपीएल ३ आठवड्यांवर, तरीही वेळापत्रकाची घोषणा नाही, कारण...
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती.
दुबई : कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती. पण भारतातला कोरोना व्हायरस नियंत्रणात येत नसल्यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला. १९ सप्टेंबरपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे, तर १० नोव्हेंबरला आयपीएलची फायनल खेळवली जाईल. पण स्पर्धा आता ३ आठवड्यांवर येऊन ठेपली, असली तरी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सीरिजमुळे आयपीएल वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर होत, असल्याचं सांगितलं जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे.
सीरिज संपल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १७ किंवा १८ तारखेला म्हणजेच आयपीएल सुरू व्हायच्या एक दिवस आधी युएईमध्ये पोहोचतील, पण कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी बनवलेल्या नियमांमुळे हे खेळाडू सुरुवातीच्या दोन ते तीन मॅचना मुकतील. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू असणाऱ्या टीमचं मोठं नुकसान होईल. या कारणासाठी आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे खेळाडू नसलेल्या टीममध्ये होतील, असं बोललं जातंय.
राजस्थानला मोठा फटका
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सीरिजचा सर्वाधिक फटका हा राजस्थानला बसणार आहे. राजस्थानच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जॉस बटलर हे खेळाडू नसतील. तर कोलकात्याला इओन मॉर्गन आणि पॅट कमिन्सशिवाय सुरुवातीचे सामने खेळावे लागतील. पॅट कमिन्सला कोलकात्याने सर्वाधिक बोली लावून विकत घेतलं आहे.
हैदराबादच्या टीमलाही डेव्हिड वॉर्नरशिवाय सुरुवातीच्या मॅच खेळाव्या लागणार आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या गैरहजेरीत हैदराबादची टीम केन विलियमसनला कर्णधारपद देऊ शकते. विराटच्या बंगळुरू टीममध्येही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच सुरुवातीला दिसणार नाही. पंजाबलाही ग्लेन मॅक्सवेलशिवाय सुरुवातीला खेळावं लागेल.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सीरिजचा मुंबईच्या टीमला फटका बसणार नाही, कारण क्रिस लिन आणि नॅथन कुल्टर-नाईल हे मुंबईचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टीमचा हिस्सा नाहीत.
३० ऑगस्टपर्यंत आयपीएलच्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेती मुंबई आणि उपविजेती चेन्नईच्या टीममध्ये होण्याची शक्यता आहे.