मुंबई : आयपीएलच्या नव्या मोसमाआधी बंगळुरूच्या टीमने त्यांचा लोगोमध्ये बदल केले. नव्या लोगोचं अनावरण करण्याआधी बंगळुरूच्या टीमने त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जुने फोटो डिलीट केले होते, त्यामुळे बंगळुरू टीमच्या चाहत्यांना प्रश्न पडले होते. बंगळुरू टीमचं नाव बदललं जाणार का? अशा शंका चाहत्यांनी उपस्थित केल्या. अखेर बंगळुरू टीमने नव्या लोगोचं अनावरण करुन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूच्या टीमने लोगो बदलल्यानंतर त्यांचा जुना सहमालक विजय माल्ल्याने निशाणा साधला आहे. मस्तच... आता ट्रॉफी जिंका ! असा खोचक सल्ला देणारं ट्विट विजय मल्ल्याने केलं आहे.



विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू टीममध्ये असतानाही बंगळुरूला एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे नेहमीच बंगळुरूच्या टीमवर टीका केली जाते. यंदा मात्र लोगो बरोबरच नशीबही बदलेल, अशी अपेक्षा बंगळुरूच्या टीमची आणि त्यांच्या चाहत्यांची असेल.


२००८ साली आयपीएलच्या टीम लिलावामध्ये विजय मल्ल्याने बंगळुरूच्या टीमला विकत घेतलं आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असं नाव टीमला दिलं. पहिल्याच मोसमातल्या खराब कामगिरीनंतर मल्ल्याने टीममध्ये बदल केले. यानंतर दोन वेळा बंगळुरूची टीम फायनलमध्ये पोहोचली, पण एकदाही त्यांना आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही.


२०१६ साली बंगळुरूच्या टीमने सर्वोत्तम कामगिरी केली होती. विराट कोहलीने त्या मोसमात तब्बल ९७३ रन केल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमातली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. विराटच्या या कामगिरीमुळे २०१६ साली बंगळुरूने फायनल गाठली होती, पण हैदराबादने त्यांचा पराभव केला. यानंतर २०१७ साली बंगळुरू आठव्या क्रमांकावर, २०१८ साली सहाव्या क्रमांकावर आणि २०१९ साली आठव्या क्रमांकावर राहिली.


भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्ल्याला आरसीबी व्यवस्थापनाने टीमचं कोणतंही पद भुषवण्यापासून डच्चू दिला. तसंच एफ-१ फोर्स इंडियाची मालकीही विजय माल्ल्याकडून गेली.