यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्यातील प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन्सीत चेन्नईची (CSK) टीम पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुणांसह अव्ववलस्थानी आहे. धोनीने याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून आतापर्यंत धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबतची चर्चा अधूनमधून नेहमीच सुरु असते. दरम्यान आता धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने (Brad Hogg) प्रतिक्रिया दिली आहे. (ipl 2021 australia former spinner brad hogg on csk captain mahendra singh dhoni retirment)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉग काय म्हणाला? 


"मला वाटतं धोनी या मोसमातील अखेरपर्यंत आयपीएलमधून निवृत्त होईल. ज्या प्रकारे धोनी कोलकाता विरुद्ध वरुण चक्रवर्तीच्या बोलिंगवर आऊट झाला, त्यावरुन धोनीच्या बॅटिंगची धार कमी झाल्याचं स्पष्ट होतंय. धोनीच्या बॅट आणि पॅडमध्ये अंतर होतं. धोनी ज्या प्रकारे आऊट झाला, त्यावरुन त्याचं वय झाल्याचं स्पष्ट होतंय. मात्र धोनी अजूनही नेहमीच्या पद्धतीने शानदार किपींग करतोय", असंही हॉगने नमूद केलं. हॉग त्याच्या यूट्युबवर बोलत होता.  


"धोनीची धार बोथट"


धोनीच्या नेतृत्वाची धार कायम असणं हे चेन्नई आणि भारतीय क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत. धोनी नेहमीप्रमाणे मैदानात संयमपणा बाळगतो. तसेच धोनी रवींद्र जाडेजाला नेहमीच पाठिंबा देत असतो. धोनी जाडेजाला नेहमीच सहकार्य करत असतो. मात्र ज्या पद्धतीने धोनी बॅटिंग करतोय त्यावरुन त्याच्या बॅटिंगची धार बोथट होतं आहे", असंही हॉगने स्पष्ट केलं. धोनी कोलकात विरुद्ध अवघी 1 धाव करुन तंबूत परतला. 


मेन्टॉरबाबत काय म्हणाला?


धोनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा मेन्टॉर असणार आहे. याबाबतही हॉगने प्रतिक्रिया दिली. "धोनी लवकरच मॅनेजमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसू शकतो. तसेच येत्या काळात तो चेन्नईचा हेड कोचही होऊ शकतो. धोनीला चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटमध्ये संधी मिळाल्यास त्याच्या अनुभवाचा फायदा हा नव्या दमाच्या खेळाडूंना होईल. तसेच धोनी संघासाठी रणनिती ठरवू शकेल", असंही हॉग म्हणाला.