मुंबई : आयपीएल 2021 च्या 19 व्या लीग सामन्यात सीएसकेचा आरसीबीशी सामना झाला. या सामन्यात धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आरसीबीचा 69 धावांनी पराभव केला. सीएसकेच्या या मोठ्या विजयात संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा मोठा हात होता. प्रथम फलंदाजी त्यानंतर गोलंदाजीतही त्याने उत्तम कामगिरी केली. जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तो मॅन ऑफ द मॅच देखील ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जडेजाचा विक्रम


रवींद्र जडेजाने आरसीबीविरूद्ध एक तुफानी डाव खेळला आणि 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या. पहिल्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने विक्रमी 37 धावा फटकावत 5 षटकार ठोकले आणि सीएसकेची धावसंख्या 191 वर नेली. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने जोरदार गोलंदाजी केली.


जडेजाने आरसीबीविरुद्ध चार ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. जहडेजाने ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स आणि वॉशिंग्टन सुंदर, तसेच डॅनियल क्रिस्टीन या फलंदाजांना सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करून बादही केले. या सामन्यात जडेजाने अर्धशतक ठोकले आणि तीन विकेट घेतले. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने सीएसकेसाठी अशी कामगिरी केली नव्हती. सीएसकेसाठी हा पराक्रम करणारा जडेजा पहिला खेळाडू ठरला.


या सामन्यात सीएसकेने आरसीबीविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सवर 122 धावाच करता आल्या आणि त्यांचा पराभव झाला. या सामन्यात विराट कोहलीने 8 धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेलने 22 धावा केल्या. एबी डिविलियर्सने 4 धावा तर देवदत्त पद्धिकलने 15 बॉलमध्ये 34 धावा केल्या.