IPL 2021:नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीचा जलवा, पुन्हा एकदा KKRने मारली बाजी
नितीश राणा-राहुल त्रिपाठीचा मैदानात धुरळा; हैदराबादला पुन्हा पराभूत करण्यात KKR यशस्वी
मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामातील तिसरा सामना चेपॉकवर पार पडला. KKRनं आपल्या विजयाची परंपरा कायम राखत हैदराबाद संघाचा 10 धावांनी पराभव केला. चेपॉक स्टेडियमवर दोन विदेशी कर्णधार आमनेसामने भिडले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स असा सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघानं बाजी मारली आहे.
मैदानात नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीचा जलवा पाहायला मिळाला. दोघांच्या अर्धशतकी खेळीनं संघाला मोठा विजय मिळवून दिला. या दोघांच्या अर्धशतकी खेळीवर संघानं 6 गडी गमवून 187 धावा केल्या आणि हैदराबाद संघाला 188 धावांचं लक्ष्य दिलं. हैदराबाद संघाने 5 विकेट्स गमववून 177 धावा केल्या. कोलकाता संघातील गोलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली.
हैदराबाद संघात डेव्हिड वॉर्नरची तुफान बॅटिंग झालीच नाही. अवघ्या 3 तर ऋद्धिमान साहा अवघ्या 7 धावा काढून तंबुत परतले. मनीष पांडे आणि जॉनी बेअरस्टोने उर्वरित सामना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र 10 धावांसाठी पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. मागच्या हंगामातही दोन वेळा कोलकाता संघाकडून हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या मौसमात देखील हैदराबाद संघाचा पराभव झाला आहे.
केकेआरसाठी सलामीला येताच नितीश राणाने शानदार फलंदाजी केली. त्याने 56 चेंडूत 80 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 4 षटकार लगावले. याशिवाय राहुल त्रिपाठीने 29 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच वेळी दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 22 धावा फटकावल्या आणि केकेआरची धावसंख्या 187/6 वर आणली.