मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा (IPL 2021) दुसरा टप्पा रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये चुरस पाहिला मिळतेय. प्ले ऑफमधली चौथी टीम कोणती असणार हे आज स्पष्ट होईल. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने याआधीच प्ले ऑफमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आयपीएलच्या इतिहासात याआधी असं कधीच घडलं नव्हतं. ते आता या हंगामात घडणार आहे. 


आयपीएलच्या वेळापत्रकात बदल


आयपीएल (IPL) साखळी सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. या हंगामातील शेवटचे दोन सामने एकाच वेळी म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता खेळवले जाणार आहेत. सनराईजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामने खेळवले जाणार आहेत. याआधी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार होता. पण आता हे दोन्ही सामने एकाच दिवशी एकाच वेळेत खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने (BCCI) एक पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. 


वाद टाळण्यासाठी निर्णय?


प्लेऑफ गाठण्यासाठी संघांचे समान गुण असल्यास नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफचा संघ ठरवला जातो. गेल्या हंगामात बंगलोर आणि दिल्लीदरम्यानच्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) संथ फलंदाजीमुळे बराच वाद निर्माण झाला होता. याचा फटका कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) बसला होता. यंदाही प्लेऑफ गाठण्यासाठी संघांमध्ये मोठी चुरस आहे. त्यामुळे वाद टाळण्यासाठी आयपीएलने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी निर्णय?


बीसीसीआयच्या निर्णयाचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे. पुढच्या वर्षी आयपीएलसाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या शहरात एकाचवेळी सामने खेळवले जाण्याची शक्यता असून त्यामुळे प्रेक्षकसंख्येतही वाढ होऊ शकते असं म्हटलं जात आहे. कारण दुपारच्या सामन्यांना प्रेक्षकांच उपस्थिती कमी असते. त्यामुळे आर्थिक नुकसाही सहन करावं लागतं. 


कोरोनामुळे पहिला टप्पा स्थगित


आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा पहिला टप्पा कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स संघात (CSK) कोरोनाची प्रकरण समोर आली होती. यामुळे लीग थांबवण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचा दुसरा टप्पा भारताबाहेर दुबई, आबुधाबी  इथं खेळवण्याचा निर्णय घेतला. 19 सप्टेंबरपासून सुरु झालेला आयपीएलचा दुसरा टप्पा 15 ऑक्टोबरपर्यंत खेळवला जाणार आहे. साखळी सामने आज संपणार असून यानंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील. क्वालीफाईंग सामन्याव्यतिरिक्त एक एलिमिनेटर सामना आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 


आयपीएलच्या इतिहासात पहिलीच घटना


2008मध्ये आयपीएल सुरु झाल्यानंतर आतापर्यंत कधीच एकाच वेळी दोन सामने खेळवले गेले नव्हते. यंदा पहिल्यांदाच ही घटना घडणार आहे. हैदराबाद आणि मुंबई दरम्यानचा सामना अबुधाबीमध्ये तर बंलगोर आणि दिल्लीदरम्यानचा सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.