IPL 2021: कोलकाता संघातील आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
याआधी वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर दोघंही पॉझिटिव्ह आले होते. या दोन्ही खेळाडूंपाठोपाठ ऋद्धिमान साहा आणि अमित मिश्राचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
मुंबई: IPLमध्ये कोरोनानं थैमान घातलं. बायो बाबलमध्ये शिरकाव करत 4 खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर IPLचे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. वरून चक्रवर्तीनंतर आता आणखी एक कोलकाता संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या खेळाडूला अहमदाबाद इथे क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कोलाकाता संघातील न्यूझीलंडचा खेळाडू टीम सीफर्टचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. न्यूझीलंडमधील सर्व खेळाडू आयपीएल 2021 स्थगित झाल्यानं आपल्या देशात परतले आहेत. मात्र सीफर्टला कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत भारतातच राहावं लागणार आहे. अहमदाबादमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये सध्या तो राहात आहे. सीफर्टची आरटीपीसीआर चाचणी दोन वेळा पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला इतर खेळाडूंसोबत न्यूझीलंडला जाता आलं नाही.
सीफर्टच्या मागच्या 10 दिवसांतील 7 टेस्ट निगेटीव्ह आल्या होता. मात्र घरी परतण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो न्यूझीलंडसाठी रवाना होईल. तिथे देखील 14 दिवस त्याला क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.
याआधी वरून चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर दोघंही पॉझिटिव्ह आले होते. या दोन्ही खेळाडूंपाठोपाठ ऋद्धिमान साहा आणि अमित मिश्राचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय दोन कोच देखील पॉझिटिव्ह आल्यानं IPL 2021चे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत.