IPL 2022 चं बिगुल वाजलं; `या` तारखेपासून सुरु होणार आयपीएल
कोरोनाचं सावट असतानाही यंदाच्या वर्षी भारतातच आयपीएल होणार आहे.
मुंबई : तमाम क्रिकेट चाहत्यांना ज्याची उत्सुकता आहे ती अखेर घडलीच...आयपीएलच्या 15 व्या सिझनची तारीख पक्की झाली आहे. गुरुवारी झालेल्या आयपीएल गव्हर्नर काऊंसिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार आहे. कोरोनाचं सावट असतानाही यंदाच्या वर्षी भारतातच आयपीएल होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना आयपीएलच्या तारखांचे वेध लागले होते. यावेळी आयपीएलचं आयोजन मुंबई आणि पुण्यामध्ये केलं जाणार आहे. 26 मार्चपासून सुरु होणारी आयपीएलची स्पर्धा केवळ 4 मैदानावर खेळवली जाणार आहे. यामध्ये 55 सामने मुंबईच्या तर 15 सामने हे पुण्याच्या मैदानावर खेळवले जाणार आहे.
यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 20, डीवायपाटीलमध्ये 20, सीसीआयमध्ये 15 तर पुण्यात 15 सामने खेळवले जाणार आहेत. यासंदर्भात अजून एक बैठक घेण्याबाबत आयपीएल गव्हर्नर काऊंसिलच्या बैठकीत चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या चारही स्टेडियममध्ये चाहत्यांना सामने पाहण्याची एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करावं लागणार आहे. 20-25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळू शकते.
2022 च्या आयपीएलमध्ये या टीम्सचा समावेश
1. दिल्ली कॅपिटल्स
2. चेन्नई सुपर किंग्स
3. मुंबई इंडियंस
4. रॉयल चैलेंजर्स बंगळुरु
5. कोलकाता नाइट रायडर्स
6. पंजाब किंग्स
7. गुजरात टायटन्स
8. लखनऊ सुपर जायंट्स
9. सनराइजर्स हैदराबाद
10. राजस्थान रॉयल्स