मुंबई : टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीममधून खेळतोय. आयपीएलचे तब्बल आठव्या सिझन चहल रॉयल चॅलेंजर बंगळूरूसाठी खेळला. मात्र 15 व्या सिझनसाठी त्याला टीमकडून रिटेन करण्यात आलं नाही. यानंतर रिटेन न केल्याचं दुःख झालं असल्याचं चहलच्या बोलण्यातून जाणवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर बंगळूरूने केवळ विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तिघांना रिटेन केलं. यावेळी रिटेंशनबाबत मला विचारण्यातंही आलं नसल्याचं युझवेंद्र चहलने म्हटलं आहे. 


युझवेंद्र चहलने रिटेंशनसंदर्भात मोठं विधान केलं आहे. चहल म्हणाला, क्रिकेटचे संचालक माईक हेसन यांनी मला फोन केला. यावेळी त्यांनी आरसीबीने रिटेन केलेल्या तीन खेळाडूंची नावं मला सांगितली. आरसीबीची टीम सोडून इतर कोणत्या टीमसाठी खेळण्याचा मी त्यावेळी विचारंही केला नव्हता. 


एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना चहल म्हणाला, मी भावनिकदृष्ट्या आरसीबी टीमशी जोडलो होतो. मी कधी विचारही केला नव्हता की, मी इतर कोणत्या टीमसाठी खेळेन. आरसीबीने मला विचारलंही नाही की तुला रिटेन व्हायचं आहे की नाही. त्यांनी कॉल करून रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं सांगून लिलावामध्ये तुझा विचार करू असं सांगितलं. मला किती पैसे हवेत हेही विचारलं नाही, तसंच मला रिटेंशनचा प्रस्तावंही आला नाही.


मेगा ऑक्शनमध्ये युझवेंद्र चहलला राजस्थान रॉयल्सने 6.5 कोटी रुपयांना विकत घेतलं. मुख्य म्हणजे आरसीबीने ऑक्शनमध्ये त्याच्यावर कोणतीही बोलीही लावली नाही. आज राजस्थान रॉयल्सचा आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील पहिला सामना आहे.