CKS vs GT Head to Head in IPL: इंडियन प्रमियर लिग म्हणजेच आयपीएलचं यंदाचं पर्व आजपासून सुरु होत आहे. आयपीएलचा पहिला सामना अवघ्या काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. आज म्हणजेच 31 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. नेमके कोणते खेळाडू या पहिल्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील, कोणाला वगळं जाईल यासंदर्भातील चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. असं असतानाच आकडेवारी कोणाच्या बाजूने आहे याबद्दलची चर्चा सुरु आहे. मात्र खरोखरच या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे हे जाणून घेऊयात...


किती वेळा आमने-सामने आले हे संघ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात आणि चेन्नईचे संघ केवळ 2 वेळा आमने-सामने आले आहेत. अर्थात मागील पर्व हे गुजरातचं पहिलेच पर्व होते. गुजरातने आपल्या पहिल्या पर्वामध्येच थेट जेतेपदापर्यंत मजल मारली होती. चेन्नई आणि गुजरातदरम्यान झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातनेच विजय मिळवला आहे. यापैकी एक सामना मागील वर्षी एप्रिलमध्ये तर दुसरा मे महिन्यात झाला होता. दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पंड्यानेच गुजरातच्या संघाचं नेतृत्व केलं होतं. मागील वर्षी चेन्नईने नेतृत्वामध्ये बदल करत धोनीऐवजी रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र जडेजाला फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने पुन्हा नेतृत्व धोनीकडे आलं.


या सामन्यांमध्ये काय घडलं


गुजरातने चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये धावांची पाठलाग करताना 3 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये डेव्हिड मिलरने स्फोटक फलंदाजी करत गुजरातला विजय मिळवून दिलेला. मिलरने 94 धावांचं योगदान दिलं होतं आणि ते ही केवळ 51 चेंडूंमध्ये. चेन्नईसाठी थोडीशी दिलासादायक बातमी म्हणजे आजच्या म्हणजेच 31 मार्चच्या सामन्यामध्ये मिलर खेळत नाहीत. मे महिन्यामध्ये झालेल्या सामन्यामध्येही गुजरातने विजय मिळवला होता. हा सामना त्यांनी 7 विकेट्सने जिंकलेला.


दुसऱ्या सामन्यामध्ये चेन्नईला केवळ 133 धावांपर्यंत मजल मारता आलेली. गुजरातच्या संघाने 5 चेंडू शिल्लक असतानाच 3 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या गाठली होती. या सामन्यामध्ये ऋद्धिमान साहाने अर्धशतक झळकावलं होतं.