Fans Angry On Hardik Pandya: इंडियन प्रिमियर लिगच्या यंदाच्या पर्वामधील सातवा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. हा गुजरातला सलग दुसरा विजय आहे. या सामन्यामध्ये गुजरातकडून साई सुदर्शनने अर्धशतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या खेळीसाठी साईला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईला डेव्हिड मिलरने चांगली साथ दिली. साईने 48 चेंडूंमध्ये 52 तर मिलरने 16 चेंडूंमध्ये 31 धावा केल्या. या खेळींमुळे गुजरातचा विजय नक्कीच सुखकर झाला. या सामन्यानंतर गतविजेत्या गुजरातने सलग 2 सामने जिंकत पॉइण्ट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं असलं तरी चाहते गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यावर नाराज आहेत. पांड्याने केलेल्या एका कृतीमुळे अनेकजण त्याच्यावर रागावले आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये पांड्या अगदी हातवारे करुन सामना जिंकवून देणाऱ्या डेव्हिड मिलरला काहीतरी सांगताना दिसतोय. मिलर आणि पंड्याचा हा फोटो गुजरातच्या डगआऊटमधील आहे. पंड्या मिलरला काहीतरी समजावून सांगताना दिसत आहे. मात्र पंड्या ज्या पद्धतीने मिलरशी बोलत होता ते पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी यावरुन पंड्याला सुनावलं आहे.



हुशार लोक कमी बोलतात


या फोटोमधील पंड्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून अनेकांनी तो स्वत:ला काय समजतो असं विचारलं आहे. पंड्याला आपण फार ग्रेट असल्याचं वाटत आहे असं एकाने म्हटलं असून त्यावर अन्य एका चाहत्याने तो फार उड्या मारतोय अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. अन्य एकाने एक फोटो शेअर करत सूचक पद्धतीने पंड्यावर निशाणा साधला आहे. या फोटोतून जास्त हुशार लोक कमी बोलतात असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



तर पंड्या आता जगातील नंबर वन फिनिशरला सल्ले देतोय असा टोला एका चाहत्याने लगावला आहे.



चाहत्यांनी घेतली बाजू


पंड्यांच्या चाहत्यांनीही यावर कमेंट करुन आपल्या हिरोची बाजू मांडली आहे. पंड्या स्वत:ला धोनी किंवा विराट का समजतो या कॅप्शनवरुन पंड्याच्या एका चाहत्याने रिप्लाय केला आहे. या चाहत्याने पंड्याचा आयपीएलचा चषक पकडलेला फोटो पोस्ट करताना, "कारण तो चॅम्पियनशिप जिंकला आहे आणि ती सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात जे विराट कोहलीला 10 वर्षांमध्ये आणि अद्यापही जमलेलं नाही," असं म्हटलंय.



पंड्याने मागील वर्षी पहिल्यांदाच गुजरातचं नेतृत्व करताना संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. यंदाच्या पर्वातही गुजरातची टीम फारच चांगला खेळ करत असून पुढील फेरीपर्यंत मजल मारेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.