IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. यानंतर सगळीकडे महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नावाची चर्चा सुरु असून त्याच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक होत आहे. धोनीचं कौतुक करणाऱ्यांमध्ये त्याचा माजी सहकारी आणि माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरचाही (Gautam Gambhir) समावेश आहे. गौतमं गंभीरने धोनीचं कौतुक करणारं ट्वीट (Twitter) करत अभिनंदन केलं आहे. धोनीवर नेहमी टीका करणाऱ्या गौतम गंभीरचं हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईने टॉस जिंकल्यानंतर गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली होती. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 214 धावांचा डोंगर उभा केला होता. पण चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात होताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी भिजली असल्याने ती सुकवण्यासाठी वेळ लागला. यानंतर अखेर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा सामना सुरु करण्यात आला. यावेळी चेन्नईसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. 


चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. पण नंतर विकेट्स गेल्यानंतर सामना पुन्हा गुजरातच्या बाजूने झुकला होता. पण अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांनी चेन्नईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण अखेरच्या षटकांमध्ये मोहित शर्माने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे गुजरातचा विजय होणार असं दिसत होतं. सामना अखेर 2 चेंडूवर 10 धावांपर्यंत आला होता. यावेळी जाडेजाने आधी षटकार आणि नंतर चौकार लगावत गुजराच्या अक्षरश: तोंडून घास हिरावून घेतला. 


यानंतर गौतम गंभीरने ट्वीट करत चेन्नई सुपरकिंग्सला शुभेच्छा दिल्या आहेत. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणं हे अविश्वसनीय असल्याचं गौतम गंभीरने म्हटलं आहे. ट्वीटमध्ये गौतम गंभीरने लिहिलं आहे की, "अभिनंदन CSK! एकदा ट्रॉफी जिंकणं कठीण आहे, पण 5 वेळा जिंकणं अविश्वसनीय आहे".


गौतम गंभीरने निवृत्ती घेण्याआधी दोन वेळा ही कामगिरी केली आहे. 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करताना त्याने आयपीएलचा खिताब जिंकला होता. दरम्यान, या हंगामात गौतम गंभीर लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) मेंटॉर होता. पण प्लेऑफमध्ये ते पोहोचू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सने चेपॉक मैदानात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा पराभव करत त्यांच्या आशांवर पाणी फेरलं. याच सामन्यात मुंबईच्या आकाश माधवालने 5 विकेट घेत संघाला प्लेऑफमध्ये नेलं होतं. 


आयपीएल 2023 सुरु होण्याआधी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण धोनीने पुढील हंगामातही आपल्याला येऊन खेळायला आवडेल असं म्हटलं होतं. “तुम्ही परिस्थिती पाहिली तर, निवृत्ती जाहीर करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. धन्यवाद म्हणणे आणि निवृत्त होणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट आहे. पण नऊ महिने कठोर परिश्रम करून आणखी एक आयपीएल हंगाम खेळण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे. शरिराला तसं राखावं लागेल. पण सीएसकेच्या चाहत्यांकडून मला जेवढे प्रेम मिळाले आहे, त्यांच्यासाठी आणखी एक हंगाम खेळणे ही त्यांच्यासाठी भेट असेल,” असं धोनी म्हणाला.


अखेरच्या चेंडूंवर रवींद्र जाडेजाने चौकार लगावल्यानंतर धोनीने त्याला उचलून घेत आनंद साजरा केला. जाडेजानेही हा विजय धोनीला समर्पित केला आहे. ट्विटरला त्याने फोटो शेअर केला असून धोनीसाठी काहीपण असंही त्याने म्हटलं आहे.