IPL 2023 Eliminator: केवळ मॅच नाही तर खेळ 133 कोटी रुपयांचा! MI vs LSG सामन्याची ही बाजूही समजून घ्या
Eliminator IPL 2023 MI vs LSG: आज चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्द लखनऊन सुपर जायंट्सदरम्यान आयपीएल 2023 मधील एलिमिनेटर सामना खेळवला जात असून पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. हा सामना जिंकणारा संघ क्विलिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.
Eliminator IPL 2023 MI vs LSG: इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या (IPL 2023) पर्वातील एलिमिनेटर (Eliminator IPL 2023) सामना आज म्हणजेच 24 मे रोजी चेन्नईमधील एमए चिदंम्बरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. साखळी फेरीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघादरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळेच दोन्ही संघांच्या लाखो चाहत्यांची नजर या सामन्याकडे लागून राहिलेली आहे. मात्र दोन्ही संघांसाठी करो या मरो प्रकारचा हा सामना तब्बल 133 कोटींचा आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे.
लखनऊचे खेळाडू मालामाल
मुंबई आणि लखनऊच्या संघांमधील जे खेळाडू या सामन्यामध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी संघ मालकांनी मोजलेली किंमत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पॉइण्ट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या लखनऊच्या संघामध्ये कोट्यावधी रुपये देऊन खेळाडूंना आयपीएलच्या लिलावात विकत घेतलं आहे. कर्णधार के. एल. राहुलसाठी संघाने 15 कोटी मोजले. जखमी झालेल्या राहुल स्पर्धेबाहेर झाला आहे. राहुलबरोबरच संघातील वेस्ट इंडिजचा खेळाडू निकोलस पूरनसाठी संघाने 16 कोटी रुपये मोजले आहेत. त्याचप्रमाणे तुफान फलंदाजी करणाऱ्या स्टॉयइनिससाठी 11 कोटी, आवेश खानसाठी 10 कोटी रुपये मोजले आहेत. राहुल जखमी झाल्याने अचानक कर्णधारपदाची जाबबदारी खांद्यावर पडलेल्या क्रुणाल पंड्यासाठी लखनऊच्या मालकांनी 8.25 कोटी रुपये मोजले आहेत. तसेच विकेट किपर बॅट्समन क्विंटन डिकॉकसाठी 6 कोटी 75 लाख रुपये संघाने मोजले आहेत. दीपक हुडासाठी 5 कोटी 75 लाख रुपये संघाने मोजले आहेत.
लखनऊने फिरकीपटू रवी बिश्नोला 4 कोटींची तर नवीन-उल-हक आणि कायल मायर्सला प्रत्येकी 50 लाखांना संघाने विकत घेतलं आहे. लखनऊच्या संघाने इंग्लंडच्या मार्क वूडला 7 कोटी 50 लाखांना विकत घेतलं. पण तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सर्व खेळाडूंसाठी लखनऊच्या संघाने तब्बल 63 कोटी रुपये खर्च केले आहेत. याच खेळाडूंच्या जोरावर लखनऊच्या संघ स्पर्धेत पुढे मजल मारणार की कच खाऊन बाहेर पडणार हे ठरणार आहे.
मुंबईच्या खेळाडूंसाठी कोटी कोटी रुपये
दुसरीकडे लखनऊप्रमाणेच मुंबईच्या संघातील खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांचा हिशोब लावल्यास तो लखनऊच्या एकूण आकडेवारीपेक्षाही अधिक आहे. 5 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईतील मुख्य खेळाडूंसाठी मोजलेल्या पैशांबद्दल बोलायचं झाल्यास कर्णधार रोहित शर्मासाठीच मुंबईने 16 कोटी मोजले आहेत. रोहितपेक्षाही अधिक किंमतीला विकत घेतलेला खेळाडू आहे कॅमरॉन ग्रीन. ग्रीनने साखळी फेरीतील खेळीतून आपल्यासाठी एवढी किंमत का मोजली आहे हे सिद्धा करुन दाखवलं आहे. ग्रीनबरोबरच कोट्यावधींची उडी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ईशान किशानचाही क्रमांक आघाडीवर आहे. त्याच्यासाठी मुंबईच्या संघाने तब्बल 15 कोटी 25 लाख रुपये मोजले आहेत.
टीम डेव्हीडसाठीही मुंबईने 8 कोटी 25 लाख रुपये. सुर्यकुमार यादवसाठी 8 कोटी मोजले आहेत. त्या खालोखाल तिलक वर्मासाठी 1 कोटी 75 लाख रुपये, क्रिस जॉर्डनसाठी 2 कोटी आणि जेसन बेहरनड्रॉफसाठी 75 लाख रुपये मोजले आहेत. तर यंदाच्या पर्वात मुंबईसाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या पीयूष चावलाला 50 लाखांमध्ये मुंबईने संघात घेतलं आहे. मुंबईच्या या सर्व खेळाडूंसाठी संघ मालकांनी मोजलेली एकूण किंमत 70 कोटूींहून अधिक आहे.