MI vs RCB head to head record in IPL: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये यंदाच्या पर्वातील (IPL 2023) 54 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघ पराभूत झाल्याने या सामन्यामध्ये विजय मिळवून प्ले ऑफ्सच्या शर्यतीमध्ये आपली दावेदारी कायम ठेवण्याच्या उद्देशानेच दोन्ही संघ मैदानात उतरतील. या आधीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा तर दिल्लीने बंगळुरुचा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण जिंकणार यावर पॉइण्ट्स टेबलमध्येही बरीच हलचाल दिसून येईल. मुंबई आणि आरसीबीचा हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो पाहूयात...


मुंबईचं पारडं जड पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि आरसीबीचा संघ आतापर्यंत 31 वेळा आमने-सामने आला आहे. यापैकी शेवटच्या सामन्यात म्हणजेच यंदाच्या पर्वात झालेल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला होता. एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईचं पारडं जड दिसतं. 31 पैकी 17 सामन्यांमध्ये मुंबईचा तर 14 सामन्यांमध्ये बंगळुरुने विजय मिळवला आहे. मात्र मागील 5 सामन्यांपैकी केवळ 1 सामना मुंबईने जिंकला असून 4 सामने आरसीबीने खिशात घातलेत.


मुंबईच्या मैदानावरील आकडेवारी काय सांगते?


मुंबईतील सामन्यांची आकडेवारी पाहिल्यास घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मुंबईला होईल असं आकडेवारी दर्श्वते. मुंबईत हे दोन्ही संघ 9 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी 3 सामने बंगळुरुने तर 6 मुंबईने जिंकले आहेत. मुंबईत खेळवण्यात आलेल्या शेवटच्या 5 सामन्यांपैकी केवळ 1 सामना बंगळुरुने जिंकला आहे. मुंबईमध्ये 2019 मध्ये हे दोन्ही संघ शेवटचे आमने-सामने आले होते तेव्हा मुंबईने बंगळुरुवर 5 विकेट्स राखून विजय मिळवलेला.


नक्की वाचा >> IPL 2023 Sixes: सर्वाधिक Six मारणाऱ्या संघांच्या यादीत KKR अव्वल! पाहा Mumbai Indians कितव्या स्थानी


वानखेडेवरील मुंबईचा रेकॉर्ड कसा?


वानखेडे स्टेडियमवरील मुंबईच्या संघाची कामगिरी पाहिल्यास या मैदानात मुंबईचा संघ एकूण 75 आयपीएल सामने खेळला आहे. यापैकी 45 सामने मुंबईने जिंकलेत तर 29 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी विजय मिळवला आहे. 1 सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर खेळवलेल्या शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईने राजस्थानच्या संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. शेवटच्या 5 सामन्यांपैकी या मैदानावर मुंबईने 3 सामने जिंकले तर 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.


सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण?


मुंबई आणि आरसीबीदरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या 31 सामन्यांमध्ये खेळताना 851 धावा केल्या आहेत. त्या खालोखाल आरसीबीचा निवृत्त खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रमांक लागतो त्याने 20 सामन्यांमध्ये 693 धावा केल्यात. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने 23 सामन्यांमध्ये खेळताना 567 धावा केल्या आहेत.