IPL 2023: अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटचं मुंबई इंडियन्सने केलं सेलिब्रेशन, पाहा VIDEO
IPL 2023: हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) बाद करत आपल्या नावावर पहिल्या विकेटची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्यांनी अर्जुनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाचं सेलिब्रेशन केलं आहे.
IPL 2023: मुंबई इंडियन्सने मंगळवारी हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात विजय मिळवत हॅटट्रीक केली आहे. मुंबईने 14 धावांनी हैदराबादचा पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएल (IPL) करिअरमधील आपल्या पहिल्या विकेटची नोंद केली. अर्जुनने 20 वी ओव्हर टाकताना हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारला बाद केलं. रोहितने कव्हरला सहजपणे भुवनेश्वरचा झेल घेतला.
दरम्यान अर्जुन तेंडुलकरच्या करिअरमधील या महत्वाच्या क्षणाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने विशेष केक मागवला होता. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये अर्जुन केक कापताना दिसत आहे.
दरम्यान खेळानंतर आपल्या रणनीतीबद्दल सांगताना अर्जुन म्हणाला की, त्याने वाइड यॉर्कर्स टाकण्याचं ठरवलं होतं. आपण नेहमीच आपल्या वडिलांसोबत खेळाबद्दल चर्चा करतो. आम्ही यावेळी एक सामायिक चर्चा करत असतो असं अर्जुनने सांगितलं आहे.
"फलंदाजापासून दूर चेंडू टाकण्याची माझी योजना होती, जेणेकरुन फलंदाज लांबच्या बाजूला शॉट खेळेले. मला गोलंदाजी करायला आवडते आणि कोणत्याही क्षणी ती करण्यास मी तयार असतो. मी आणि वडील (सचिन) क्रिकेटबद्दल फार बोलत असतो. आम्ही रणनीती, योजना यावर चर्चा करत असतो. मी गोलंदाजी करताना चेंडू फेकण्याची वेळ आणि लांबी यावर लक्ष केंद्रीत करत असतो. जर बॉल स्विंग झाला तर तो बोनस असतो. पण नाही झाला तर ठीक," असं अर्जुनने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितलं.
मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा विजय
नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली सुरुवात करुन दिली होती. पण दोघे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. कॅमेरून ग्रीनने जोरदार खेळी करत 64 धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर मुंबईने हैदराबादसमोर 194 धावाचं लक्ष्य ठेवलं होतं. पण हैदराबादचा संपूर्ण संघ 19.5 षटकांत 178 धावांत सर्वबाद झाला.
हैदराबादला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना रोहितने अर्जुन तेंडुलकरकडे चेंडू सोपवला. अर्जुननेही विश्वास सार्थ ठरवत फक्त 4 धावा दिल्या. यावेळी त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही घेतली.