IPL 2023: मुंबई इंडियन्सने मीटिंगला उशिरा येणाऱ्या खेळाडूंना शिकवला धडा, आयुष्यभर विसरणार नाही अशी शिक्षा
IPL 2023: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने टीम मीटिंगला उशिरा येणाऱ्या अर्शद खान (Arshad Khan) आणि ह्रितिक शोकीन (Hrithik Shokeen) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांचे फोटोही मुंबईने ट्विटरला शेअर केले आहेत.
IPL 2023: आयपीलच्या (Indian Premiere League) या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आपली छाप पाडण्यात अपयशी ठरत आहे. सुरुवातीचे सामने गमावल्यानंतर दणक्यात पुनरागमन करणारा मुंबई संघ पुन्हा एकदा विजय मिळवताना अडखळताना दिसत आहे. दरम्यान, मुंबई संघ सध्या पंजाब किंग्सविरोधात (Punjab Kings) आपला 46 वा सामना खेळण्याची तयारी करत आहे. मोहालीमधील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडिअममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. याआधी दोन्ही संघ आमने-सामने आले असता पंजाबने 13 धावांनी ही सामना जिंकला होता.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मैदानाबाहेरही खेळाडूंनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. इतकंच नाही, तर नियमांचं पालन न करणाऱ्या खेळाडूंना अशी शिक्षा दिली आहे की आयुष्यभर ते विसरु शकणार नाहीत. नुकतंच मुंबईने टीम मीटिंगला उशिरा येणाऱ्या दोन खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
टीम मीटिंगला उशिरा येत असल्याने मुंबई इंडियन्सने अर्शद खान (Arshad Khan) आणि ह्रितिक शोकीन (Hrithik Shokeen) या दोन खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. संघाने त्यांना आगामी सामन्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचताना जम्पसूट घालायला लावले. या जम्पसूटवर खेळाडूंचे फोटो छापण्यात आले होते. मुंबईने ट्विटरला दोन्ही खेळाडूंचे जम्पसूट घातलेले व्हिडीओ शेअऱ केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, टीम मीटिंगला कधीही उशिरा येऊ नका! अर्शद आणि ह्रितिक तुम्हाला याचं कारण सांगतील. यावेळी त्यांनी हसतानाचे इमोजीही शेअर केले आहेत.
व्हिडीओमध्ये अर्शद खान याला तू वेगळा शर्ट का घातला आहेस? असं विचारण्यात आलं असता तो सांगतो की, "मी दोन मीटिंगला उशिरा पोहोचलो होतो. दोन्ही मीटिंगवेळी मी झोपलो होतो, त्यामुळे 10 मिनिटं उशीर झाला होता". तर ह्रितिकने आपण प्रॅक्टिसला उशिरा पोहोचलो होतो असं सांगितलं.
व्हिडीओमध्ये अर्शद आणि ह्रितिकला जम्पसूटमध्ये पाहून संघातील इतर खेळाडू त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. काहींना मोबाइलमध्ये त्यांचे फोटो काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. दरम्यान दोन्ही खेळाडू विमातनळावरुन बसकडे जात असताना, इतर लोकही त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते.