Naveen Ul Haq ची पुन्हा एक Insta Story! Virat Kohli ला `Sir` म्हणत माफी मागितल्याबद्दल म्हणाला, `या...`
Naveen Ul Haq On Viral I am Sorry Virat Kohli Post: आयपीएलमधील लखनऊविरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हकमध्ये मैदानात वाद झाला आणि पुढे तो वाद वाढतच गेला.
Naveen Ul Haq On Viral I am Sorry Virat Kohli Post: आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये (IPL 2023) सामन्यामधील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील शाब्दिक चकमकीमुळे चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन-उल-हक (Naveen Ul Haq). अफगाणिस्तानच्या या खेळाडूचा बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) मैदानातच वाद झाला. त्यानंतर त्याने अनेकदा अप्रत्यक्षपणे विराटला इन्स्ताग्राम स्टोरीवरुन डिवचलं. कधी आरसीबीच्या पराभवानंतर पोस्ट केलेले आंब्यांचे फोटो तर आरसीबी प्लेऑफ्सच्या आधीच बाहेर पडल्यानंतर पोस्ट केलेल्या हसणाऱ्या व्यक्तीच्या व्हिडीओमुळे नवीन-उल-हक चर्चेत राहिला. मात्र आता त्याला त्याची चूक उमगली आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यामागील कारण आहे व्हायरल झालेलं एक ट्वीट. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतरही नवीन-उल-हकने एक इन्स्ता स्टोरी पोस्ट केली आहे.
काय होतं ट्वीट?
लखनऊ सुपर जायंट्सचा संघ बुधवारी मुंबईविरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडला. यानंतर नवीन-उल-हकच्या ट्विटर हॅण्डलवरुन, 'मला माफ करा विराट कोहली सर' अशी पोस्ट करण्यात आल्याचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. हे ट्वीट 24 मे 2023 रोजी रात्री 11 वाजून 53 मिनिटांचं असल्याचं दिसत आहे. अखेर नवीनने विराटची माफी मागितली असा दावा करणारं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झाला. जाहीररित्या नवीनने माफी मागितल्याने विराटच्या चाहत्यांनी हा स्क्रीनशॉट व्हायरल केला. काहींनी तर विराट बाबर आझमपेक्षाही श्रेष्ठ असल्याचं या पोस्टखाली म्हटलं होतं. अनेकांना हे ट्वीट खऱ्या खात्यावरुन करण्यात आल्याचं वाटलं. मात्र आता या व्हायरल ट्वीट प्रकरणाला वेगळचं वळण मिळालं आहे.
नवीनचं म्हणणं काय?
मात्र या व्हायरल ट्वीटचा स्क्रीनशॉट नवीनने स्वत: इन्स्ताग्राम स्टोरीवर पोस्ट करताना आपल्या नावाने ज्या पोस्टवरुन ट्वीट करण्यात आलं आहे ते अकाऊंट फेक म्हणजेच खोटं असल्याचं म्हटलं आहे. तसेच या हे खास फेक म्हणून मार्क करावं असं आवाहन नवीनने केलं आहे. "या खोट्या अकाऊंटवरुन कोणाला मेसेज मिळाले असतील तर ते रिपोर्ट करा," अशी ओळ या खोट्या अकाऊंटचा स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत नवीनने इन्स्ता स्टोरीमध्ये लिहिली आहे.
नेमकं घडलं काय?
लखनऊमध्ये झालेल्या लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान विराट आणि नवीनचा वाद झाला होता. यानंतर नवीनने अनेकदा अप्रत्यक्षपणे विराट आणि आरसीबीवर टीका केली. विराटच्या चाहत्यांनी यानंतरच्या अनेक सामन्यामध्ये विराट विराटच्या घोषणा देत नवीनला डिवचलं. या चिडवण्यासंदर्भात नवीनला विचारण्यात आलं असता त्याने मला याची फार मजा येते आणि यामधून मला अधिक चांगलं खेळण्यासाठी प्रेरणाम मिळते, असं म्हटलं आहे.