IPL Chenai Super Kings Ravindra Jadeja: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या (IPL 2023) नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 31 मार्चला नव्या हंगामातील पहिला सामना पार पडणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्या सामन्यात आमने-सामने असणार आहेत. महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नईच्या कर्णधारपदी दिसणार आहे, तर दुसरीकडे गतवर्षीचा चॅम्पियन संघ गुजरात टायटन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई संघाने आतापर्यंत चार वेळा आयपीएल जिंकली आहे. मात्र गेला हंगाम चेन्नई संघासाठी फार चांगला गेला नाही. हंगाम सुरु होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नईने रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवलं होतं. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करण्यात सपशेल अपयशी ठरला. 


गेल्या हंगामात वाद


गेल्या हंगामात जाडेजाच्या नेतृत्वात खेळताना चेन्नई संघ सुरुवातीच्या 8 सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यातच विजय मिळवू शकला होता. यामुळे संघ व्यवस्थापनाने रवींद्र जाडेजाकडून कर्णधारपद काढून घेत पुन्हा एकदा धोनीकडे सोपवलं. पण यानंतर चेन्नई संघ प्लॅऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. पण यादरम्यान, कर्णधार पदावरुन हटवल्याने जाडेजा फार नाराज झाला होता. 


प्रकरणं इतकं तापलं होतं की, रवींद्र जाडेजा संघाचं हॉटेल सोडून गेला होता. त्याने सोशल मीडियावरुनही चेन्नई संघासोबतचे सर्व फोटो, व्हिडीओ हटवले होते. जाडेजा आणि चेन्नई यांच्यात बिनसलं असून आता काही सुरळीत होणार नाही असं वाटत असतानाच धोनीने पुढाकार घेतला. धोनीने जाडेजाची समजूत काढली आणि पुन्हा एकदा संघात परत आणलं. 



Cicbuzz ने यासंबंधी दिलेल्या रिपोर्टनुसार, धोनी आणि जाडेजा यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. यानंतर जाडेजाने चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्याशीही समोरासमोर बसून चर्चा केली. यावेळी त्याने आपली नाराजी जाहीर करत भविष्यात नेमक्या काय अपेक्षा आहेत हे सांगितलं.


तुझ्या खांद्यावर कर्णधारपदाचं ओझं पडत असून, याचा तुझ्या खेळावर परिणाम होत असल्याचं संघ व्यवस्थापनाकडून जाडेजाला सांगण्यात आलं. जादेजालाही हे म्हणणं पटलं. धोनी आणि विश्वनाथन यांनी नेमका काय गैरसमज झाला होता हे स्पष्ट केलं.