IPL 2023: `आम्ही यासाठीच पात्र आहोत,` KKR विरोधातील पराभवानंतर विराट कोहली संघावर संतापला
IPL 2023: कोलकाताविरोधात (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात पराभव झाल्यानंत बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सहकाऱ्यांना कडक शब्दांत कडे बोल सुनावले आहेत. या पराभवासाठी आम्ही पात्र आहोत असं त्याने म्हटलं आहे.
IPL 2023: एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाताने (Kolkata Knight Riders) 21 धावांची बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव केला. यासह बंगळुरुने सलग चौथा सामना गमावला आहे. कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावत 200 धावा केल्या होत्या. बंगळुरुकडून विराट कोहली (Virat Kohli) वगळता कोणताही फलंदाज चांगली खेळी करु शकला नाही. बंगळुरु संघाचे खेळाडू मैदानात जिंकण्याच्या आवेशात दिसले नाहीत. एकीकडे गोलंदाजांना कोलकाताच्या फलंदाजांनी चांगलं धुतलं असताना, दुसरीकडे क्षेत्ररक्षण करताना अनेक सोपे झेल सोडण्यात आले. या सर्व गोष्टींमुळे कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपल्या संघाला खडे बोल सुनावत आपला संताप व्यक्त केला.
"खरं सांगायचा तर, आम्ही त्यांच्याकडे विजय सोपवला. आम्ही पराभवासाठीच पात्र आहोत. आम्ही प्रोफेशनल पद्धतीने खेळलो नाही. आम्ही गोलंदाजी चांगली केली, पण क्षेत्ररक्षण दर्जात्मक नव्हतं. आम्ही अगदी सहजपणे त्यांना विजय दिला आहे," असं संतापलेल्या विराट कोहलीने म्हटलं आहे.
"क्षेत्ररक्षण करत असताना मधील 4 ते 5 ओव्हर्समध्ये आम्ही झेल सोडले. यामुळे 25 ते 30 अतिरिक्त धावा आम्ही दिल्या. फलंदाजी करताना आम्ही चांगले सेट झालो होतो, पण नंतर चार ते पाच सहज विकेट्स आम्ही दिल्या. हे चेंडू इतके चांगले नव्हते, पण आम्ही थेट हातात झेल दिले. धावांचा पाठलाग करताना विकेट्स जात असतानाही एका भागीदारीने आम्हाला पुन्हा सामन्यात आणलं होतं. पण आम्हाला अशीच एक भागीदारी कमी पडली. आम्ही चांगल्या पद्धतीने खेळण्याची गरज आहे," असं विराट म्हणाला.
सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताकडून जॅसन रॉयने तुफान फलंदाजी करत संघाला 200 धावांचा डोंगर उभारण्यास मदत केली. जॅसनने 29 चेंडूत 56 धावा ठोकल्या. कोलकाताने या विजयासह गेल्या चार सामन्यांपासून सुरु असलेली पराभवाची मालिका खंडीत केली आहे.
कोलकाताकडून फिरकी गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती (3/24) आणि सुयश शर्मा (2/30) यांनी बंगळुरुच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. रसलने विराट कोहलीची विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेंकटेश अय्यरने त्याचा जबरदस्त झेल घेतला.
बंगळुरु आठ विकेट गमावत फक्त 179 धावा करु शकला. कोहलीने 34 चेंडूत 54 धावा करत एकट्या बाजूने खिंड लढवली होती. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही.