Sanju Samson On Sandeep Sharma No Ball: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये म्हणजेच आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी (7 मे रोजी) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयलर्स सामन्यामध्ये हैदराबादने अगदी शेवटच्या चेंडूवर चित्तथरारक विजय (RR loss to SRH) मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. हैदराबादचा यंदाच्या पर्वातील आपला चौथा विजय अगदी अॅण्टी क्लायमॅक्स ठरला. संदीप शर्माने (Sandeep Sharma) सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल टाकल्याने (Sandeep Sharma No Ball) सामना जिंकल्याचा विजय साजरा करणाऱ्या राजस्थानच्या खेळाडूंच्या आनंदावर विरझण पडलं. याच संधीचा फायदा घेत हैदराबादच्या अब्दुल समादने (Abdul Samad) शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना षटकार लगवात संघाला विजय मिळवून दिला. सामन्या मोक्याच्या क्षणी नो बॉल टाकणाऱ्या संदीप शर्माबद्दल राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने सामना संपल्यानंतर सूचक विधान केलं.


संजू गोंधळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूरच्या मैजानावर कोणत्याही संघाने यशस्वीपणे धावांचा पाठलाग करत साकारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. सामन्यानंतर समालोचकांशी बोलताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फारच वैतागलेला दिसत होता. त्याने अनपेक्षितरित्या मिळालेल्या या पराभवाचं विश्लेषणही केलं. अशाप्रकारच्या पराभवांसाठी प्रत्येक खेळाडूने तयार राहिलं पाहिजे असं मत व्यक्त करतानाच राजस्थानच्या संघाबद्दल भाष्य करताना वैतागलेल्या संजूला शब्द सापडत नसल्याचं चित्र पहायला मिळालं. प्रश्न विचारणाऱ्या समालोचकाने राजस्थानच्या संघाने आणखी धावा करायला हव्या होत्या का? असा प्रश्न विचारला असता संजू गोंधळून गेल्याचं दिसलं.


"मला उत्तर ठाऊक नाही"


"हा चांगला प्रश्न आहे. पण मला याचं उत्तर ठाऊक नाही," असं उत्तर संजूने या प्रश्नाला दिलं. संजूचं उत्तर ऐकून प्रश्न विचारणाराही गोंधळून गेल्याचं दिसलं. रॉयलर्सच्या संघाने 20 षटकांमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावांचा डोंगर उभारला होता. संजूने स्वत: 38 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या.



"संदीपवर विश्वास होता"


अगदी शेवटच्या चेंडूवर पराभावाचं तोंड पहावं लागल्याने संजूने आयपीएलचा फॉरमॅटच असा आहे असं म्हटलं. "यासारख्या सामन्यांमुळे आयपीएल अधिक स्पेशल ठरतं. तुम्ही सामना जिंकल्याचं कधीच गृहित धरु शकत नाही. कोणीही हा सामना जिंकू शकला असतं हे मला ठाऊक आहे. त्यात ते (हैदराबादचे फलंदाज) चांगली बॅटींग करत होते. मात्र मला संदीप वर विश्वास होता," असंही संजूने शेवटचा चेंडू नो बॉल पडल्यासंदर्भात विचारलं असता सांगितलं.


"त्याने यापूर्वी आम्हाला..."


संदीपबद्दल बोलताना संजू सॅमसनने यापूर्वी त्याने आम्हाला अशा कठीण परिस्थितीमधून सामना जिंकून दिल्याची आठवण करुन दिली. "त्याने (संदीप शर्माने) यापूर्वी आम्हाला अशापद्धतीच्या परिस्थितीमधून (चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा) सामना जिंकून दिला आहे. त्याने पुन्हा तशीच कामगिरी केलेली मात्र त्या नो बॉलमुळे निकाल फिरला," असं संजू म्हणाला.


"आपलं काम फत्ते झालं आहे असं वाटल्याने तुम्ही..."


शेवटचा चेंडू नो बॉल पडल्यासंदर्भात तुला काय वाटतं असं विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना संजूने, "त्यावर काय बोलणार? तो नो बॉल होता. तुम्हाला पुन्हा तो चेंडू टाकावा लागला याबद्दल तुम्ही फार विचार करु शकत नाही," असं उत्तर दिलं. "संदीपला माहिती होतं काय करायचं. आपलं काम फत्ते झालं आहे असं वाटल्याने तुम्ही मानसिक दृष्ट्या काही क्षणांसाठी थोडे रिलॅक्स होता. प्रत्येकजण त्या चेंडूआधी आनंद साजरा करत होता. पण हा खेळ असाच आहे. अशा मोक्याच्या क्षणी तुम्ही त्या रेषेच्या पुढे पाऊल टाकायचं चूक करता कामा नये," असं संजू म्हणाला.